'आरक्षण नाही तर मतदान नाही , मतं मागायला येऊ नका'; ओबीसींनी लावल्या घरावर पाट्या
गोंदिया : भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओबीसींच्या घरावर 'आरक्षण नाही तर मतदान नाही , मतं मागायला येऊ नका' अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्या पाहून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणलेत. मागास प्रवर्गातील निवडणुका स्थगित झाल्याने ओबीसी समाजाकडून असा संताप व्यक्त केला गेला आहे़
इतर मागासवर्गीयांना आरक्षण बहाल करणाऱ्या राज्य सरकारच्या वटहुकमाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली़, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून नामाप्र प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली. दरम्यान भंडारा जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २५ जागांसाठीची निवडणूक या आदेशाने स्थगित झाली. त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात.
ठिकठिकाणी सभा घेऊन या निणर्याचा विरोध केला जात आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी होत आहे. भंडारा तालुक्यातील पिंपरी पुनवर्सन येथे ओबीसी समाजाच्या नागरिकांनी घरावर मतबहिष्काराच्या पाट्या लावल्यात. घराच्या दर्शनी भागात लावलेल्या या पाट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून राज्यात याची चर्चा सुरू झाली आहे. भंडारा जिल्हा परिषदच्या ३९ गट व पंचायत समितीच्या ७९ गणातील निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी ३६१ तर पंचायत समितीसाठी ५४४ उमेदवार रिंगणात आहेत. परंतु, या उमेदवारांना आता ओबीसी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.