कोविड प्रादुर्भावाच्या भूमीवर कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभा अभिवादन कार्यक्रमाला बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही कोरोनामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी३० डिसेमबर २०२० रात्री बारा वाजल्यापासून 2 जानेवारी 2021 सकाळी सहा वाजेपर्यंत पेरणे आणि परिसरातील कार्यक्रम व गर्दी करण्यास तसेच बाहेरील व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश करण्यास शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.
या काळात केवळ पोलिसाकडून दिलेले पास धारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.प्रामुख्याने लोणीकंद पोलिस ठाणे परिसरातील लोणीकंद ते बाळापुर खुर्द, केसनंद, खोलवाडी डोंगरगाव, शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव-भीमा,डिग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक,पिंपळे जगताप, वाडेगाव या गांवामधे गावाबाहेरील लोकांना गावांमध्ये येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात होणार असल्याने पेरणे विजयस्तंभ व परिसरात सभा,मंडप, खाद्य पदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रीचे स्टॉलवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिसांच्या परवानगी शिवाय या परिसरात व्यक्ती व वाहनांनाही प्रवेश नसेल. प्रतिबंधित गावांमध्ये लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगणे तसेच बॅनर, फ्लेक्स, होर्डींगवरही प्रतिबंध असणार आहे. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासासाठी रॅली, पदयात्रा, वादग्रस्त फलक व घोषणांवरही निर्बंध घालण्यात आले असून समाज माध्यमात चुकीची माहीती, अफवा पसरविण्यावरही कडक निर्बंध असणार आहेत. तसेच बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तीना हॉटेल, लॉजेस इतर आस्थापनात वास्तव्यासही प्रतिबंध असेल.
प्रतिबंधात्मक आदेशातून अत्यावश्यक वैदयकीय, अग्नीशमन, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलीसांनी दिलेले पासधारकांनाही सवलत असेल. मानवंदनेसाठी येणारे पासधारक, शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची कोवीड तपासणी व मार्गदर्शक सूचनांचे पालन तसेच मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच आदेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने ग्रामीण भागातही गर्दीची शक्यता असल्याने मावळ, मुळशी, हवेली तालुक्यासह शिरुरमधील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्धुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येही दि. 25 डिसेंबर ते दि.5 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11.00 ते सकाळी 06.00 पर्यंत जमावबंदीचे आदेशजिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील परवानगीधारक व्यक्तीना यातून सुट असेल .