'नो वन किल्ड मोहसिन'; न्यायालयाने सर्व आरोपींची केली निर्दोष मुक्तता
सोलापूर येथील आय टी इंजिनियर मोहसिन शेख हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मोहसिन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.;
पुण्यातील हडपसर (Pune) परिसरात राहणाऱ्या मोहसिन शेख (Mohaseen Shaikh) या आय टी इंजिनियर (IT Engineer) तरुणाची जून 2014 मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अखेर 27 जानेवारी 2023 रोजी मोहसिन शेखच्या हत्या प्रकरणातील धनंजय देसाईसह 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
कोण होता मोहसिन शेख? (Who is Mohasin)
सोलापूर (Solapur) येथील मोहसिन शेख हा युवक पुण्यातील आयटी कंपनीत काम करीत होता. मात्र तो मुस्लिम असल्याच्या कारणातून मोहसिनची हत्या करण्यात आली. त्यामुळे मोहसिनच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि मोहसिनला न्याय मिळावा, यासाठी त्याचे मित्र आणि नातेवाईक प्रयत्न करीत होता. मात्र 27 जानेवारी 2023 रोजी पुणे न्यायालयाने मोहसिन शेखच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेले हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह 20 जणांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे मोहसिन शेखच्या हत्या प्रकरणात कुणीच आरोपी नसेल तर हत्या कशी झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायदानावरच प्रश्न उपस्थित होत आहे.
मोहसिन शेख प्रकरण काय आहे? (What is matter of Mohasin shaikh murder case)
सोलापूर येथील मोहसिन शेख नोकरीच्या निमीत्ताने पुणे शहरातील हडपसरमध्ये स्थायिक झाला होता. मात्र 2 जून 2014 रोजी महापुरुषांविषयीचे वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर पुणे शहरात दंगल उसळली होती. यावेळी मोहसिन शेख नमाज पठन करून मशीदीतून बाहेर पडला. त्यावेळी सायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी मोहसिन शेखवर वार करत हत्या केली. यानंतर मोहसिनचा भाऊ मोबीन मोहम्मद सादीक (Mobeen Mohammad Sadik) याने पोलिसांमध्ये फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह 20 जणांना पोलिसांनी येरवडा येथून अटक केली होती. मात्र पुढे 2019 मध्ये उच्च न्यायालयाने धनंजय देसाई यांना जामीन मंजूर केला. तसेच आता न्यायालयाने मोहसिन शेखच्या हत्येतील आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे मॉब लिंचिंग प्रकरणात न्यायालयाने मोहसिनचे मारेकरी कुणीच नसल्याचे म्हटले आहे. मग मोहसिनला मारहाण करणारे आणि हत्या करणारे कोण? असा सवाल करत न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.