कोणत्याही व्यक्तीला लसीकरणासाठी सक्ती करता येणार नाहीः सर्वोच्च न्यायालय
दिल्लीः आज सर्वोच्च न्यायालयात लसीकरणाच्या सक्ती संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बीआर गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने लसीकरणाची सक्ती करता येणार नाही. असा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
काही राज्य सरकारांनी लसीकरण न करणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य नसल्याचं म्हटलं आहे. कोणतंही सरकार काही नियम बनवू शकतं तसेच लोकांच्या हितासाठी काही अटी घालू शकतं. मात्र, लसीकरणाची सक्ती करू शकत नाही. दरम्यान, सध्याच्या लसीकरण धोरणाला अयोग्य आणि मनमानी म्हणता येणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
केंद्राचे प्रतिज्ञापत्र...
17 जानेवारी 2022 रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात कोरोना लसीकरणाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. केंद्राने आपल्या प्रतिज्ञापत्रात, देशभरात कोरोना लसीकरण अनिवार्य नाही, तसेच लस घेण्यासाठी कोणावरही दबाव नाही. असं या प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं.
दरम्यान, अद्यापपर्यंत देशात कोरोनामुळे ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 43 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 5.2 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहीतीनुसार, देशात 4.2 कोटी लोक कोरोना होऊन बरे झाले आहेत. तर, गेल्या 24 तासांत कोविडचे 3,157 नवीन रुग्ण आढळले आहेत.