डिझेलला पैसे नाहीत, गर्भवती महिलेसह रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावर
डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने गंभीर रुग्णाला घेउन रुग्णवाहिका एक तास पेट्रोल पंपावर उभी राहण्याचा प्रकार चंद्रपूर येथे घडला आहे. काय आहे हा संतापजनक प्रकार वाचा सविस्तर.
रुग्णवाहिकेत डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती रुग्णाला घेऊन सुमारे एक तास रुग्णवाहिका पेट्रोल पंपावर थांबल्याची संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपींपरी तालुक्यात घडली आहे. धाबा या गावातील गर्भवती मोनिका रामदास तांगडपलेवर यांना उपचारासाठी धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. रुग्णाला पोहचविण्यासाठी धाबा आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका निघाली. नियमित व्यवहार असणाऱ्या गोंड पिंपरी येथील एका पेट्रोलपंपावर रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी थांबवण्यात आली. पण अगोदरची डिझेलची उधारी वेळेत न मिळाल्याने पेट्रोल पंप चालकाने डिझेल उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर चालक पैशाची जुळवाजुळव करू लागले. धक्कादायक बाब म्हणजे पैसे मिळेपर्यंत सुमारे एक तास रुग्णवाहिका गंभीर रुग्णासह पेट्रोल पंपावरच उभी होती.
अधिकाऱ्यांचे म्हणणे काय ?
आर्थिक व्यवहारासंबंधी कनिष्ठ लिपिक पद रिक्त आहे. पंचायत समिती स्तरावर बिल रखडला असल्याने हा प्रकार घडला.
रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही जबाबदार अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. चंद्रपूरवरून येणे जाणे करतात त्यांच्यावर प्रशासनाची मेहरबानी दिसत आहे. डिझेल टाकायला पैसे नाही.गर्भवती महिलेला पेट्रोल पंपावर एक तास ताटकळत राहावे लागले हा नागरिकांच्या जीवाशी होत असलेला खेळ आरोग्य प्रशासनाने थांबवावा. या गंभीर प्रकाराची चौकशी करुन चार्ज असणाऱ्या डॉ चकोले यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे(उबाठा) गोंडपींपरी तालुकाप्रमुख सुरज माडूरवार यांनी केली आहे.