राहुल-प्रियांकाचा भातुकलीचा खेळ : निखिल वागळे
गेल्या आठवड्यात मॅक्स महाराष्ट्रवरुन निखिल वागळेंनी कॉंग्रेसबाबत घेतलेल्या आक्षेपांनंतर मोठा वाद झाला. वाद-प्रतिवादात अजित अनुजोशी यांनी त्यांना उत्तर दिलं होत. त्यांचा निखिल वागळेंनी पुन्हा प्रतिवाद केला आहे.;
प्रिय अजित जी,
सुरवातीलाच तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही मुद्दयाला मुद्दयाने उत्तर दिलंत. इतर काही काँग्रेस समर्थकांप्रमाणे मला ट्रोल केलं नाहीत, शिवीगाळ केली नाहीत की संघी एजंट ठरवलं नाहीत. अजूनही लोकशाहीचा संस्कार तुमच्यावर शिल्लक आहे हे पाहून मन गदगदून गेलं. अर्थात, आपल्या या युक्तीवादाशी मी सहमत नाही. तुम्ही काँग्रेसप्रेमी आहात आणि त्याच त्रोटक नजरेतून बघत आहात. मी एक पत्रकार म्हणून हे सविस्तर उत्तर देत आहे.
१.आपल्या मुद्दयांकडे वळण्याआधी सांगतो, कॉंग्रेस पक्ष मरणासन्न आहे हे माझं मत कायम आहे. आपले नेते कपिल सिबल आणि गुलाब नबी आझाद यांनी हीच टीका केली आहे. राहुल गांधींच्या धरसोड वृत्तीवर त्याचा रोख दिसतो. गेल्या ६ वर्षात भाजपशी मुकाबला करण्यात पक्षाचं नेतृत्व अपयशी ठरलं आहे. राहुल गांधी यांच्यात सातत्य नाही हे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केलं आहे. आज जनतेला नव्हे, तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही पक्षाबद्दल विश्वास वाटत नाही.
२.पंतप्रधान मोदी हे हुकूमशाही वृत्तीचे आहेत यात काही शंका नाही. अनेक लोकशाही संस्थात त्यांनी हस्तक्षेप केला आहे. पण त्यांनी निवडणूक आयोग भ्रष्ट केलाय या आपल्या आरोपात काही तथ्य नाही. आयोगावर दबाव आहे, पण त्याने मोदींपुढे पूर्ण शरणागती पत्करलेली नाही.अजूनही भारतीय निवडणूक प्रक्रिया बऱ्यापैकी नीट पार पडते आहे. पराभूत पक्ष नेहमी आरोप करतात, पण आजवर कुणीही न्यायालयात गेलेलं नाही. बिहार निवडणुकीनंतर तेजस्वी यादव आणि कॉंग्रेस यांनी आरोप केले, पण पुरावा दिला नाही. हे सर्व आरोप आयोगाने फेटाळून लावले. कॉंग्रेसला आक्षेप होता तर याविरुद्ध आंदोलन का उभारलं नाही? कोर्टात का अर्ज केला नाही? आता रडीचा डाव कशासाठी ?
२०१४ ते २० या काळात भाजपपाठोपाठ काही राज्यात कॉंग्रेस आणि विरोधकांना विजय मिळाला आहे. त्यावेळी निवडणूक प्रक्रिया निर्दोष होती काय? वस्तुस्थिती ही आहे की मोदी-शहांच्या निवडणूक मशिनचा मुकाबला कॉंग्रेस करु शकत नाही. तेवढी जिद्द आणि दृष्टी कॉंग्रेसच्या नेतृत्वात नाही. म्हणून तुम्ही रडता आहात. इव्हीएमबाबत तोच प्रकार. या यंत्रात दोष असतील, पण ती हॅक केली जातात या आरोपाला दुजोरा मिळालेला नाही. २००९ ला कॉंग्रेस सत्तेत आली तेव्हा हाच आरोप भाजपने केला होता. मोदी ईव्हीएमच्या हेराफेरीतून जिंकतात या आक्षेपात तथ्य नसल्याचं प्रणव राॅय आणि सुहास पळशीकर यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. तेव्हा या रुदालीत काही दम नाही. तुम्हाला निवडणूका जिंकता येत नाहीत हे कबूल करा.
३.मोदीविरोधी लढण्यात सर्व विरोधी पक्षांना अपयश आलेलं असताना काँग्रेसचीच का चर्चा होते, असा आपला प्रश्न आहे. कॉंग्रेसकडून अपेक्षा आहेत म्हणून ही चर्चा होते. गांधी-नेहरुंचा वारसा सांगणारा हा पक्ष फॅसिझमचा पद्धतशीर मुकाबला करण्यात करंटेपणा दाखवतो तेव्हा लोकांच्या पदरी निराशा येते.आपण म्हणता राहुल लढतात, पण कुठे? ट्विटरवर ? हाथरससारखा गेस्ट परफॉरमन्स ते किंवा प्रियांका देतात आणि गायब होतात. बिहार निवडंणुकीच्या वेळी ते पिकनिकला निघून गेले. मग कार्यकर्त्यानी काय करायचं? मोदी-शहा २४ तास राजकारण करतात. राहुल यांच्याकडे ती तडफ नाही. मी राहुलना भेटलो आहे. मला ते सुस्वभावी वाटतात, पण राजकीय धमक त्यांच्या दिसत नाही. इंदिराजीही उच्चभ्रू होत्या, पण संघर्षात त्यांनी कधी हार मानली नाही. आता तर राहुल यांची पक्षावरची पकड सुटली आहे.
४.आपण अण्णा आंदोलनाबद्दल विचारलं आहे. अण्णांवर तुमचा विशेष राग दिसतो.पण ते एक उत्स्फूर्त जनआंदोलन होतं हे विसरु नका. त्याला पाठिंबा दिल्याबद्दल मला खंत वाटत नाही. अण्णांच्या आंदोलनात सगळे पक्ष होते. पण त्याचा फायदा उठवला भाजपने. कारण संघाकडे तशी यंत्रणा होती. खरं तर अण्णांना अटक करुन काॅंग्रेस नेत्यांनी हिरो बनवलं. तुमच्या पक्षातल्या बेबंदशाहीमुळे अण्णांचं उपोषण चिघळलं. एकमेकांचे पाय खेचणारे तुमचे नेते अण्णांना भाजपच्या ताब्यात देऊन गेले. तीच गोष्ट रामदेव बाबाची. यावर मी लवकरच सविस्तर लिहीणार आहे.
५.कॉंग्रेस सेक्युलॅरिजम मिरवते असं आपण म्हणता. म्हणजे नेमकं काय करते? किती कॉंग्रेसी नेत्यांना सेक्युलॅरिजमची व्याख्या स्पष्ट आहे? की निवडणुकीपुरती कॉंग्रेसला सेक्युलॅरिजमची आठवण येते? नेहरुंना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिजम आज टिकलाय का? भाजपने कॉंग्रेसवर केलेल्या स्युडो सेक्युलरिजमच्या आरोपाला आजवर उत्तर मिळालेलं नाही. मुस्लीम व्होटबॅकसाठी राजीव गांधींनी शहाबानो खटल्याचा निकाल फिरवला हे सत्य आहे. राममंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी संघाला मदत केली. १९८४, १९९२-९३ आणि २००२ च्या दंगलीबाबतची काॅंग्रेसची भूमिका सेक्युलर तत्वांचं रक्षण करणारी होती काय? साचर आयोगाची अंमलबजावणी कॉंग्रेस सरकारने का केली नाही? आता कॉंग्रेसवर हिंदू-मुस्लीम दोघांचाही विश्वास राहिलेला नाही. डॉ. आंबेडकरांचा कॉंग्रेसने सातत्याने अपमान केला. पाठोपाठ दलित दूर गेले. मंडलमुळे ओबीसी फटकून वागू लागले.ही परिस्थिती का निर्माण झाली? १९९१ पासून कॉंग्रेसची सातत्याने अधोगती का होते आहे याचा विचार करा.पक्षात भ्रष्टाचार,लाचारी, दलाली यांचं सुरु झालेलं थैमान सत्ता गेली तरी थांबलेलं नाही. लोक कॉंग्रेसवर विश्वास ठेवायला का तयार नाहीत, त्यामुळे भाजपचं कसं फावतय याचाही लेखाजोखा घ्या जरा. सेक्युलॅरिजमच्या रक्षणाचं घाऊक कंत्राट कॉंग्रेसला देण्याची माझी तयारी नाही. भाजपशी लढायला इतर पक्षही आहेत.या देशातला नागरिक पक्षांपलिकडे जाऊन सेक्युलॅरिजम वाचवेल. कॉंग्रेस मेली तर नवा पर्याय उभा राहील.चिंता नसावी.
६.आपण म्हणता त्याप्रमाणे मी आणीबाणीची मांडणी अर्धवट करत नाही. कुमार केतकर तसं करतात. मी वस्तुस्थिती तोडत मोडत नाही. कारण ती माझी वृत्ती नाही. आपण गेल्या ४० वर्षातलं माझं लिखाण वाचलं नसावं बहुतेक. हल्ली लोकांना न वाचताच बोलायची सवय लागली आहे. इंदिरा गांधींनी आणाबाणीबद्ल माफी मागितली, एकदा नव्हे दोनदा,मग त्यांचे समर्थक या घटनात्मक हुकूमशाहीचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन आजही का करत आहेत? इंदिरा गांधीनी आणीबाणी लोकशाही वाचवण्यासाठी आणली, असं विनोदी विधान कॉंग्रेस खासदार कुमार केतकर यांनी अलिकडेच केलं. ते आपणांस मान्य आहे काय? मोदींवर खोटं बोलायचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार या मंडळींना आहे काय?
७.१९७३-७५ या काळात इंदिरा गांधीविरुद्ध झालेली आंदोलनं घटनाबाह्य होती हा शोध आपण लावला आहे. गुजरात, बिहार येथे जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलनं पूर्णपणे लोकशाहीवादी होती. जेपींनी लष्कराला आदेश पाळू नका असं सांगितलं हीसुद्धा कॉंग्रेसची लबाडी. बेकायदेशीर आदेश पाळू नका हे जेपींचं आवाहन होतं. त्यातला बेकायदेशीर हा शब्द तुम्ही आज ४५ वर्षांनंतरही काढून टाकत आहात. याला लबाडी म्हणायचं की अज्ञान? ७३-७५ या काळात आणि नंतर आणीबाणीत संजय गांधीनी घातलेला हैदोस विसरु नका. लाचारी, लोकशाही संस्थांचा विनाश यासाठी हा काळ प्रसिद्ध आहे. आज मोदी आणीबाणी न आणता इंदिरा गांधींचंच अनुकरण करत आहेत. कॉंग्रेसवाले याचा मुकाबला करु शकतील असं मला वाटत नाही. अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी बिथरल्या आणि स्वत:ची खुर्ची वाचवायला त्यांनी हुकूमशाही लादली हे सत्य कॉंग्रेसला आजही पचताना दिसत नाही. अशी कॉंग्रेस मोदींशी कशी लढणार?
८.गेल्या ६ वर्षात मी किती वेळा तुरुंगात गेलो असा प्रश्न आपण विचारता. मी पत्रकार आहे. याआधी तुरुंगात गेलो ते आपल्याच सत्तेच्या काळात. मोदी-शहांविरूद्ध उघड भूमिका घेऊनही अजून मी बाहेर आहे. ते जेव्हा अटक करतील तेव्हा आनंदाने गजाआड जाईन.भीमा कोरेगाव, सीएएविरोधी आंदोलनात मी सामिल झालो आहे. एल्गार परिषदेच्या स्थानबद्ध कार्यकर्त्यांसाठी सभा घेतल्या आहेत. तुमच्या पक्षाचा कोणी तरी महान नेता यात होता काय? राहुल- प्रियांका आंदोलन करत नाहीत, भातुकलीचा खेळ खेळतात असं माझं मत आहे. गेल्या ६ वर्षात आपल्या पक्षाने कोणतं मोठं आंदोलन केलं हेही सांगावं. स्थलांतरीत मजुरांसाठी काही करायची संधीही काँग्रेसने गमावली. म्हणूनच आज मोदी डोईजड झाले आहेत.
९.काॅंग्रेसने नेहरुंच्या काळापासून संघाला कशी मदत केली याविषयी मी लवकरच एक लेख प्रसिद्ध करतोय. १९४९ साली बाबरी मशिदीत रामलल्ला मूर्ती कुणी आणि कशा ठेवल्या, त्यात कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांची भूमिका काय होती हे तपासा. संघावरची पहिली बंदी नेहरुंच्या काळात उठली. हिंदू कोड बिलाच्या वेळी नेहरुंनी हिंदुत्ववादी शक्तींपुढे माघार घेतल्याने डॉ. आंबेडकरांनी राजीनामा दिला हे विसरता येणार नाही. १९८०च्या निवडणुकीत इंदिरा गांधीनीही संघाची मदत घेतली. पंतप्रधान नरसिंह राव यांनी तर बाबरी पाडणाऱ्याना खुली छूट दिली. मग इतर पक्षांवर आरोप करण्याचा अधिकार आपल्याला कसा पोचतो? संघाला प्रमाणपत्र जेपींसह इतर अनेक नेत्यांनी दिलं. ते संदर्भांसकट बघितलं पाहिजे. गांधीजीही यातून सुटले नाहीत. प्रणव मुखर्जी हे ताजं उदाहरण. संघाचा धोका आपल्या नेत्यांना कळला नाही असं म्हणावं लागेल. संघाने अशा बावळट प्रमाणपत्रांचा वापर करुन घेतला आहे. संघाशी लढायचं असेल तर संघटना बांधणी करावी लागेल. दीर्घ पल्ल्याचं काम करावं लागेल. तेवढी चिकाटी राष्ट्र सेवा दलात नाही की कॉंग्रेस सेवा दलात.
१०.शेवटी, तुम्ही मला कॉंग्रेसमध्ये सामिल होण्याचं आवाहन केलं आहे. असला धंदा मी करत नाही. मी पत्रकार आहे, मला पत्रकारच राहू द्या. कोणत्याही राजकीय पक्षात मी जांणार नाही, कॉंग्रेससारख्या रोगग्रस्त पक्षात तर नाहीच नाही. मला १९९६ ला कॉंग्रेसने ( प्रभाकर कुंटे) तर २०१४ ला केजरीवाल यांनी लोकसभा तिकीट देऊ केलं होतं. ते मी विचारपूर्वक नाकारलेलं आहे. एक विनंती. ही चर्चा कॉंग्रेसजनांनाही वाचायला द्या. फारसा परिणाम होणार नाही कदाचित, पण प्रयत्न करा. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. फुटेल कधी तरी दगडाला पाझर.
धन्यवाद. काळजी घ्या.
तुमचा मित्र,
निखिल वागळे