मनोज जरांगे आज काय घोषणा करणार ? अंतरवाली सराटी च्या सभेकडे राज्याच लक्ष
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (१४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सभा होतेय. या सभेत आज जरांगे-पाटील हे आपल्या आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्यानं या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
अंतरवाली सराटी इथल्या या सभेसाठी राज्यभरातून सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक मराठा समाजातील नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. त्यामुळं या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सभेच्या निमित्तानं मनोज जरांगे-पाटील यांनी अनेक ठिकाणी दौरे, जाहीर सभा घेत जनजागृती केली.
अंतरवाली सराटी इथं सुमारे ३०० एकर परिसरात सभेसाठी खास मैदान तयार करण्यात आलंय. सभेचं व्यासपीठ हे १५० एकरवर तयार करण्यात आलंय. तर १५० एकर जागेवर सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. ही सभा उपस्थितांनी व्यवस्थित ऐकता-बघता यावी यासाठी सभेच्या ठिकाणी २०० स्पिकर्स, २५ एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. सभेचे स्टेजही भव्य करण्यात आलंय. २५ लाख लोकं येण्याचा अंदाज असल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून २५ हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत. सभेच्या ठिकाणी चहा-नाश्ता, पिण्याचं पाणी, २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय.
दरम्यान, सभेचा एकूणच आवाका पाहता त्यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटायला लागल्या आहेत. अँड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही सभा रद्द करून मनोज जरांगे-पाटील यांना अटक करण्याची मागणी केलीय. जरांगे-पाटील यांची ही सभा हिंसक होईल, त्यामुळं त्यांना अटक करा अशी मागणीच सदावर्ते यांनी केलीय. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या सभेसंदर्भात वक्तव्य केलंय. भुजबळ म्हणाले,” अंतरवाली सराटी च्या सभेच्या तयारीसाठी ७ कोटी रूपये कुठून आले ? असा प्रश्नच भुजबळांनी उपस्थित केलाय. त्यावर मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “ भुजबळांना कुणी सांगितलं की, ७ कोटी रूपये जमा केले आहेत. भुजबळांना डिझेल टाकण्यासाठी दोन-एक हजार रूपये पाहिजेत का ? असा मिश्किल टोमणाही जरांगे-पाटील यांनी लगावलाय. भुजबळ हे वयस्कर नेते असल्यानं त्यांच्याविषयी फार काही बोलणार नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, अशी अपेक्षा जरांगे-पाटील यांनी व्यक्त केलीय.