भारतानं गुलामगिरीचं एक चिन्ह आपल्या छातीवरून उतरवलं, आजपासून भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आत्तापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं. पण आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल. आज मी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत भारतीयत्वाच्या भावनेनं भारलेला नवा ध्वज भारतीय नौदलाच्या आत्मसन्मान आणि आत्मसामर्थ्याला नवी ऊर्जा देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं.
खरं तर, बहुतेक कॉमनवेल्थ देशांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेळी सेट जॉर्ज क्रॉस झेंडा कायम ठेवला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी नौदलाच्या झेंड्यातून जॉर्ज क्रॉस काढलं. त्याऐवजी आपल्या नौदलाच्या चिन्हांवरून नवीन ध्वज स्वीकारला. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा हे प्रमुख देश आहेत. रॉयल कॅनेडियन नौदलाने २०१३ मध्ये एक नवीन झेंड्याचा स्वीकार केला. त्यांच्या झेंड्यात वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात कॅनडाचा ध्वज आणि पांढर्या पार्श्वभूमीवर कॅनेडियन नेव्हल क्रेस्ट आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2022
Historic and proud moment as Hon PM @narendramodi ji unveils the the new Naval Ensign (Nishaan) inspired by our greatest King Chhatrapati Shivaji Maharaj. pic.twitter.com/XPyzBJwnl8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कार्यक्रमाला संदेश देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम असा क्षण आहे. थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुणावले आहे. बलशाली, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा आणि मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली 'सत्यमेव जयते' असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली 'सम नो वरुनाह' हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.