अडगळीत पडलेल्या सायकली पुन्हा निघाल्या बाहेर ; नवीन सायकल खरेदी 25 टक्यांनी वाढली
बुलडाणा// गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वच नागरिक आता प्रभावी होताना दिसत आहेत आणि अडगळीत पडलेल्या सायकली पुन्हा एकदा बाहेर निघाल्या आहेत, आणि नवीन सायकली खरेदीचे प्रमाण देखील 25 टक्क्यांनी वाढले आहे.
पूर्वीच्या काळी दैनंदिन कामकाजासाठी नागरिक पायी चालायला प्राधान्य द्यायचे आणि खूपच महत्त्वाचे असेल तर दहा किलोमीटर पर्यंतचा प्रवास सायकली द्वारे करायचे, मात्र , दिवसेंदिवस पायी चालने तर दूरच झाले दुसरीकडे सायकलचे पायडल थांबून ती घरात शोभेची वस्तू बनली.सायकलचे प्रामुख्याने दोन महत्त्व आहेत, सायकल चालवल्यामुळे निरोगी आरोग्य जगता येते विविध व्याधी सायकल चालवल्याने दूर होतात, असे तज्ञांचे मत आपण नेहमी ऐकत आलोय आणि दुसरी बाब म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते, सायकल चालवल्याने कुठलाही दुष्परिणाम आज पर्यंत आपल्याला आढळून आलेला नाही, मात्र जसजसा काळ लोटत गेला तसं तसे मोठमोठे बदल होत गेले, आणि बहुतांश सायकली अडगळीत पडून तिला कायमचे कुलूप लागले.मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत आणि याची खऱ्या अर्थाने कात्री ही सर्वच नागरिकांच्या खिशाला लागली आहे, त्यामुळे पर्यायाने बहुतांश नागरिकांनी आता घराच्या आवारात कोण्या तरी कोपऱ्यात पडलेली सायकल पुन्हा एकदा बाहेर काढली आहे.अनेक नोकरदार देखील आपल्या कार्यालयात थेट सायकल घेऊन येत आहेत, आणि दुचाकीच्या रांगेत आता सायकलही उभी राहताना दिसत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात नवीन सायकल खरेदी करण्याची संख्या 25 टक्क्याने वाढली आहे, सायकलमध्ये नवनवीन प्रकार आले आहेत, या वेगवेगळ्या प्रकारांच्या सायकल घेण्यासाठी आता ट्रेंड देखील वाढत आहे असे मत सायकल विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. कोरोना आणि वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिक बेजार जरी झाले असले, तरी यातून एक सकारात्मक बाब समोर आली आहे, ती म्हणजे सायकलचे पायडल पुन्हा एकदा फिरू लागल्याने नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल हा यामुळे वाढणार एवढे मात्र निश्चित.