NDA प्रकल्पग्रस्त अद्यापही वाऱ्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचा ठिय्या
भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनेक गावांचं पुनर्वसन केलं जातं, पण या प्रकल्पबाधीतांना व्यवस्थित घरे दिली जात नाहीत किंवा कोणत्याही सुखसोयी पुरविल्या जात नाहीत, अशा तक्रारी अनेकवेळा येत असतात. असाच एक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. पुण्यातील न्यु कोकरे गावातील प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील न्यू कोपरे गाव हे नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी (NDA) च्या हद्दीत येत होते. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. तत्कानील खासदार संजय काकडे यांच्याकडे या गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी होती. परंतू या घटनेला २० वर्षे लोटली असतानाही या गावातील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेले नाही. असं प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे. प्रकल्पग्रस्तांनी याप्रकरणी प्रशासन व शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र अद्यापही त्यांनी कुठलाच दिलासा मिळालेला नाही, असे या प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
युवक क्रांती दल, महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात या प्रकरणी अनेक वेळेला आंदोलने करण्यात आली आहेत. न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत माजी खासदार संजय काकडे यांनी ठरल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना त्यांची घरे मिळवुन दिली नाहीत. या प्रकरणात तत्कालीन खासदार संजय काकडे यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप या प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. काकडे यांना जेलमध्ये पाठवले पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची घरे मिळत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात राहणार असल्याचा निश्चय केला असल्याचं या प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे.
यासंदर्भात आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी संजय काकडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता संजय काकडे म्हणाले, " पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्णपणे शासनाच्या वतीने पार पडते, त्यामुळे आम्ही सर्व लाभार्थ्यांना पूर्णपणे मदत केली आहे. सध्या या लाभापासून कुणीही वंचित नाही. शिवाय युवक क्रांती दल आणि लाभार्थ्यांचा काहीही संबंध नाही. ते माझ्यावर विनाकारण आरोप करत आहेत. जर त्यांनी त्यांचे आरोप असेच सुरू ठेवले तर मी या संदर्भात संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन." अशी प्रतिक्रिया काकडे यांनी दिली आहे. त्यामुळे आता युवक क्रांती दल आणि प्रकल्पग्रस्त काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.