महापुराचे चित्र पाहून व्यथीत झालो- शरद पवार

महापुराचे , दरडी कोसळल्याचं चित्र पाहून व्यथीत झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिली आहे. त्यांनी महापुराच्या पार्श्वभुमीवर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

Update: 2021-07-27 06:35 GMT

मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महापूर आणि दरडी कोसळल्याचं चित्र पाहून व्यथीत झाल्याचे म्हटले आहे. राज्यात आलेल्या महापुरामुळे आपण चिंतातूर असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे. या महापुराचा राज्याला मोठा फटका बसला असून अनेक घरांचं, शेतीचं मोठ नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात जवळपास नऊ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. कोकणात घरांचं मोठ नुकसान झालं आहे. तर इतरही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे. शेतीतील पिकांसह माती अक्षरश: खरडून वाहून गेली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये या महापुराने अधिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान राज्य सरकार या पुरबाधितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. सोबतच पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकार अतिरिक्त मदत लवकरच जाहीर करेल अशी आपल्याला खात्री आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

माळीण गावात ज्या पध्दतीने कायमस्वरुपी तेथील नागरिकांचे पुर्नवसन करण्यात आले त्याच पध्दतीने कोकणातील नागरिकांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून मदत केली जाणार आहे. राष्ट्रवादीकडून 16 हजार किट तयार करण्यात येत असून , यामध्ये घरगुती भांडी तसेच जीवनावश्यक वस्तूचा समावेश असणार आहे.

Tags:    

Similar News