राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, आता राहुल गांधी काय करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेले अभिनेते आणि खासदर अमोल कोल्हे आता एका नवीन वादात अडकले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेले अभिनेते आणि खासदर अमोल कोल्हे आता एका नवीन वादात अडकले आहेत. Why I Killed Gandhi ह्या सिनेमाचा प्रोमो सध्या झळकला आहे आणि अमोल कोल्हे यांनी त्यात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यामुळेच आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोसडेची भूमिका अमोल कोल्हे यांनी करणं योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदारा महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याची भूमिका कऱणं आणि हा विषय ऐन निवडणुकीच्या काळात चर्चेला येणं, यामुळे काही राजकीय प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
अमोल कोल्हे यांचे म्हणणे काय?
यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी एबीबी माझाशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे. हा सिनेमा ३० जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचे शूटिंग आपण राजकारणात प्रवेश करण्याआधी झाले होते, असे अमोल कोल्हे यांचे म्हणणे आहे. २०१७ मध्ये या सिनेमाचे शूटिंग झाले होते. त्यावेळी आपण राजकारणात सक्रीय नव्हतो. तसेच एखादी पात्र साकारतो म्हणजे आपण त्या विचारधारेशी सहमत असतो असे नाही, अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली आहे. काहीवेळा एखाद्या विचारसरणीशी आपण सहमत असतो तर काहीवेळा विचारसरणीशी सहमत नसलो तरी कलाकार म्हणून ती भूमिका करतो. आपण वैयक्तिक आयुष्यात तसेच सार्वजनिकरित्या देखील नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एक कलाकार म्हणून आपल्याला ती भूमिका करणार का असे विचारण्यात आले आणि आपण ती भूमिका केली, असे त्यांचे म्हणणे आहे. आपली विचारधार वेगळी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आपल्या पक्षातील नेतेही याबाबत टीका करु शकतात, पण त्याचे आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपली राजकीय विचारसरणी वेगळी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या वरीष्ठांना आपण याबाबत कल्पना दिलेली आहे, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांची भूमिका काय?
आता यावर राहुल गांधी काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे, कारण राहुल गांधी यांनी सातत्याने संघ परिवार आणि नथुराम गोडसे यांच्यावर हल्ला सुरू ठेवला आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर एका संघस्वयंसेवकाने राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. पण राहुल राहुल गांधी यांनी माघार न घेता लढण्याचा निर्धार करत संघर्ष सुरू ठेवला होता.
यासर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस ज्या राष्ट्रवादीबरोबर सत्तेत आहे, त्या पक्षाचे एक खासदार महात्मा गांधींच्या मारेकऱ्याची भूमिका करत असतील तर यावर राहुल गांधी यांची भूमिका काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.