अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत, नवीन वाद

Update: 2022-01-20 14:35 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेले अभिनेते आणि खासदर अमोल कोल्हे आता एका नवीन वादात अडकले आहेत. Why I called Gandhi ह्या सिनेमाचा प्रोमो सध्या झळकला आहे आणि अमोल कोल्हे यांनी त्यात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. त्यामुळेच आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोसडेची भूमिका अमोल कोल्हे यांनी करणं योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अमोल कोल्हे यांचे म्हणणे काय?

यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी एबीबी माझाशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे. हा सिनेमा ३० जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचे शूटिंग आपण राजकारणात प्रवेश करण्याआधी झाले होते, असे अमोल कोल्हे यांचे म्हणणे आहे. २०१७ मध्ये या सिनेमाचे शूटिंग झाले होते. त्यावेळी आपण राजकारणात सक्रीय नव्हतो. तसेच एखादी पात्र साकारतो म्हणजे आपण त्या विचारधारेशी सहमत असतो असे नाही, अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली आहे. काहीवेळा एखाद्या विचारसरणीशी आपण सहमत असतो तर काहीवेळा विचारसरणीशी सहमत नसलो तरी कलाकार म्हणून ती भूमिका करतो. आपण वैयक्तिक आयुष्यात तसेच सार्वजनिकरित्या देखील नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एक कलाकार म्हणून आपल्याला ती भूमिका करणार का असे विचारण्यात आले आणि आपण ती भूमिका केली, असे त्यांचे म्हणणे आहे. आपली विचारधार वेगळी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आपल्या पक्षातील नेतेही याबाबत टीका करु शकतात, पण त्याचे आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपली राजकीय विचारसरणी वेगळी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पक्षाच्या वरीष्ठांना आपण याबाबत कल्पना दिलेली आहे, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ट्विटवर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ट्विटवर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात की, " द्वेष पसरवण्यासाठी राबवले जाणाऱ्या मोहीमा, द्वेषातून केले जाणारे गुन्हे यावर चर्चा करण्यापेक्षा माध्यमं एका कलाकाराने आणि राष्ट्रवादीच्या खासदाराने नथुराम गोडसेची भूमिका साकारली यावर चर्चा करतो आहे. माध्यमांना हा कट कळलेलाच नाही" या शब्दात तुषार गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News