'भाजपमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे नेते आहेत'- नवाब मलिक
देशात सर्वात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, हे कदाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माहीती नसावं असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.;
मुंबई : देशातील काही राज्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे केंद्र सरकाचं म्हणणं आहे, मात्र भाजपकडूनच राज्यात कोरोना नियमांची पायमल्ली केली जाते असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.
एकीकडे राज्य सरकार कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला करत असताना दुसरीकडे मात्र भाजपकडून सण - उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी म्हणून मागणी केली जात आहे, तसेच धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली जात आहे, असे केल्यास गर्दी वाढून कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असताना भाजप अशी मागणी कशी करू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान काल एका दिवसात 1 कोटी नागरिकांचे लसीकरण केल्याबाबत बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार देखील 11 लाख नागरिकांचे दररोज लसीकरण करत आहे , एका दिवसात एक कोटी नागरिकांचे लसीकरण करून भागणार नाही, हे प्रमाण वाढवावे लागेल, सोबतच नागरिकांना दुसरी लस मिळवण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे, त्याबाबत ठोस कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे असं मलिक म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना, ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने काय म्हटले आहे हे जनतेला माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून ज्या पद्धतीने तपास सुरु आहे त्यावर शंका उपस्थित होत आहे. राजकीय सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करून घेणे योग्य नाही असं ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत आहेत की, महाराष्ट्राचे सरकार गुंडांच्या सहकार्याने चालत आहे मात्र भाजपमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते आहेत असा टोला मलिक यांनी लगावला.
नरेंद्र मोदी जेंव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हा दाऊद सोबत काम करणाऱ्या पुरुषोत्तम सोलंकी वरती टाडा लावण्यात आला होता, तरी त्यांना मंत्री बनवलं होतं आजही देशात सर्वात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, कदाचित चंद्रकांत दादा पाटलांना याची माहीती नसावी असं मलिक म्हणाले.