देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई करतेय - माजिद मेमन
आज सकाळीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ईडीच्याच्या रडारवर आले आहेत नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं.या प्रकरणावरुन अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यावरुनच आता देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई करतेय अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत केली. ईडी जर राजकारणाने प्रेरीत असं काम करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही असा स्पष्ट इशाराही माजिद मेमन यांनी दिला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी कारवाई करत आहे, अशी जोरदार टीका केली.
दरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता ईडीने आज जी कारवाई सुरु केली आहे. या कारवाईवर माजिद मेमन यांनी शंका उपस्थित करत ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.
सकाळपासून भाजपचे नेते याबाबत बोलत आहेत. तसेच आज सकाळीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ईडीचे अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम करतात. आम्हाला प्रश्न पडला आहे की, आजच केंद्रीय अर्थमंत्र्यांना हे वक्तव्य का करावेसे वाटले? यात नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याची शंका माजिद मेमन यांनी यावेळी उपस्थित केली.
देवेंद्र फडणवीस यांनी ११ नोव्हेंबर २०२१ रोजी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर जमीन व्यवहारासंबंधी काही आरोप केले होते. त्याच आरोपांवरून आज ईडी कारवाई करत असल्याचे माध्यमातून कळते. चार महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले होते. तरीही २००५ सालातील प्रकरणामध्ये नवाब मलिक यांच्यावर कारवाई होत असल्याचे भाजप आणि माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे. मागील काही काळापासून नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या गैरव्यवहारांबाबत मोहीम सुरु केली होती. त्या मोहीमेमुळे वानखेडेंना एनसीबीतून बाजूला केले गेले. त्यामुळेच कदाचित फडणवीस यांच्या आरोपांच्या चार महिन्यानंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई होत आहे, असा आरोपही माजिद मेमन यांनी केला.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये केंद्रीय यंत्रणेचा मोठा दुरुपयोग होताना दिसत आहे. पश्चिम बंगाल असो किंवा इतर विरोधातील राज्ये असोत, केंद्रसरकारने ईडी, सीबीआय, एनसीबी, इन्कमटॅक्स किंवा एनआयएचा वापर करुन विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे, असेही माजिद मेमन म्हणाले.
नवाब मलिक यांच्यावर पीएमएलए (Prevention of Money Laundering Act, 2002) कायद्यानुसार कारवाई होत आहे. या कायद्यानुसार चौकशीसाठी अधिकाऱ्यांना अधिकचे अधिकार दिले असले तरी त्यात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे, असे कोर्टाचे निर्देश आहेत. तसेच ज्या व्यक्तीवर कारवाई होत आहे, त्या कारवाईची कोणतीही माहिती माध्यमांसमोर येऊ द्यायची नसते, अशीही कायद्यात तरतूद आहे. मात्र आजच्या प्रकरणात केंद्रीय अर्थमंत्री यांना माध्यमांसमोर येऊन वक्तव्य करावे लागत आहे. तसेच भाजपचे लोकही माध्यमांसमोर येऊन बोलत आहेत, याचा अर्थ चोर के दाढी मे तिनका है, असा जोरदार टोला माजिद मेमन यांनी लगावला आहे.