अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधिनंतर राष्ट्रवादीत बंड झाला आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले. यानंतर राष्ट्रादीचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला होता तर अजित पवार आपल्याला शासन आपल्या दारी या शासनाच्या कार्यक्रमातून लोकांच्या भेटी घेत होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार हे सिल्वर ओक वर शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यातच आज वाय.बी. सेंटरवर सर्व राष्ट्रवादीचे आमदार मंत्री हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत.
अजित पवार गटाचे नेते आदिती तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. सेंटरवर दाखल झाले आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल हेही पवारांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
तर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही वाय.बी. सेंटरला पोहचले आहेत. "मला सुप्रिया ताईंचा फोन आला की ताबडतोब वाय.बी. सेंटर या. म्हणून मी येथे आलो आहे," असे जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी जयंत पाटलांनी अधिक बोलण्याचे टाळलं.