शरद पवार रुग्णालयात... तीन दिवसाचे उपचार..!

Update: 2022-10-31 08:13 GMT

कर्करोगाशी (cancer) झुंज देऊन राजकारणात पुर्णवेळ सक्रीय असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज मुंबईतील ब्रीच कॅंडी (breach candy)रुग्णालयात दाखल झाले आहे. तीन दिवसाच्या उपचारांनातर शरद पवार ३ नोव्हेंबरला शरद पवार शिर्डीला (shirdi) जाणार आहेत. पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर होणार असून त्यासाठी ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अशी माहिती पक्षाने दिली आहे.

81 वर्षाचे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अढळ ध्रुव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय कृषी व संरक्षणमंत्री अशा महत्वाच्या पदावंर त्यांनी जबाबदारी निभावली आहे. अलिकडेच महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा (MVA) प्रयोग करुन त्यांनी राजकीय इच्छाशक्ती अजूनही प्रबळ असल्याची साक्ष दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली आहे.

शरद पवारांना २००४ मधे कर्करोगाचं निदान झालं होतं. औरगांबादमधे मराठवाडा कँसर हॉस्पिटलच्या उद्धाटन प्रसंगी बोलताना शरद पवारांनी त्यांच्या आजारपणाची आठवण सांगितली होती. ' मी लोकसभेचा फॉर्म भरला मला महाराष्ट्र भर फिरावं लागायचं तेंव्हा डॉ. जलील भापकर माझ्यासोबत असायचे. त्यांनी मला सांगितलं तुमच्या चेहऱ्यावर सूज दिसतेय. आम्ही तपासण्या केल्या. डॉक्टरांनी सांगितले कॅन्सरची शक्यता आहे. मग मी न्यूयॉर्कला गेलो. त्यांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. त्यांनी मला विचारलं तुम्ही इथे का आलात? तर मी म्हणालो, तुमची संस्था मोठी आहे म्हणून आलो.. तर ते डॉक्टर म्हणाले महाराष्ट्रात डॉ. प्रधान यांचा आम्ही सल्ला घेतो.

मग मी पुन्हा परत महाराष्ट्रात आलो आणि ऑपरेशन केलं. त्यानंतर एक नवीन डॉक्टर मला म्हणाला, तुमची राहिलेली कामं करून घ्या. कारण तुम्ही सहा महिने राहणार आहेत, मी डॉक्टरला म्हणालो, तू निवांत बैस. मी काही जात नाही लागल्यास तुला पोचवून जाईन.. 2004 ला कॅन्सर झाला आज 2022 आहे मी आठवड्यातून चार दिवस बाहेर फिरतो..असं शरद पवारांनी सांगितलं होतं.

गेल्यावर्षीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना पोटदुखीचा त्रास होत असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ३१ मार्च २०२१ रोजी अँडोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.तीन दिवसाच्या उपचारांनातर शरद पवार ३ नोव्हेंबरला शरद पवार शिर्डीला जाणार आहेत. पक्षाचं दोन दिवसांचं शिबीर होणार असून त्यासाठी ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News