कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं क्लीन चिट दिली दिल्यानंतर एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या तपासाबद्दल थेट प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एनसीबीनं आज न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यात आर्यन खानच्या नावाचा उल्लेख नाही. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीचे डीजी एस. एन. प्रधान यांनी दिली आहे. त्यामुळे आता वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीसंदर्भात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेली अटक हा एक पूर्वनियोजित कट होता हे एनसीबीने आर्यनला दिलेल्या क्लिन चीटने स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व प्रकरणात महाराष्ट्राची देशात प्रचंड बदनामी झाली आहे. कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानं समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून तपास करताना चूक झाली. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीचा तपास वानखेडेंकडे होता. हा तपास सदोष असल्यानं वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत गृह मंत्रालयानं वानखेडेंविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.
आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात सूचक ट्वीट करण्यात आलं आहे. "आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर पाच जणांना या प्रकरणात आता क्लीनचिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबी समीर वानखेडे, त्यांची टीम आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीविरोधात कारवाई करेल का? की गुन्हेगारांना ते पाठिशी घालतील?" असा सवाल या ट्वीटमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सापडलं नसल्याचं म्हणत एनसीबीनं त्याला क्लीन चिट दिली. यामुळे वानखेडे आणि त्यांच्या टीमने केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. याप्रकरणी एका वृत्तवाहिनीनं समीर वानखेडेंशी संपर्क साधला. त्यावर आता मी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित नाही. त्यामुळे यावर काहीही बोलू शकणार नाही, असं उत्तर वानखेडेंनी दिलं. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं होतं.
आर्यन खानवर झालेली अटकेची आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. आर्यन खानला क्रूझ टर्मिनलवर अटक करण्यात आल्यापासून त्यांना एनसीबी कार्यालयात आणण्यापर्यंत एनसीबी आणि वानखेडेंवर अनेक आरोप झाले. हे प्रकरण कॅबिनेट नवाब मलिक यांनी लावून धरलं होतं. वानखेडेंसह एनसीबीच्या अनेक अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. वानखेडेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोपही करण्यात आला होता.