नवाब मलिक अडचणीत, ईडीने चौकशीसाठी घेतले ताब्यात
भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असतानाच ईडीने अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.;
केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यातच बुधवारी सकाळी 7 वा. ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पाटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
ईडीने सकाळी 7 वाजल्यापासून नवाब मलिक यांच्या घरी चौकशी केली. तर पुढील चौकशीसाठी मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केली आहे. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिक यांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा असलेला सलीम पटेल याच्यासोबत व्यावसायिक संबंध आहेत, असा आरोप केला होता. या दोघांनी मलिक यांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.
चौकशी का सुरू?
राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता की, या जमिनीची विक्री सरदार शाह वली खान आणि सलीम पटेलने केली होती. नवाब मलिकही यांचेही काही काळ या कंपनीशी संबंध होते. कुर्ला येथील एलबीएस रोडवरील या 3 एकर जमिनीची किंमत साडेतीन कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, ती केवळ 20 ते 30 लाखांत विकली. याचे सर्व पुरावे आपण केंद्रीय संस्थांना दिले आहेत, असा दावाही केला होता. मलिकांची याबाबतच चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र ही चौकशी का सुरू आहे याबाबत अजूनही ईडीकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी करण्यात आली आहे. विशेषतः दाऊद इब्राहीमच्या जवळच्या लोकांची मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी सुरू आहे. त्यात कासकर ईडीच्या सात दिवसांच्या कोठडीत आहे. या चौकशीत कासकर आणि मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याची काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहे.ईडीच्या चौकशीमुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँडरींग प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.