नरेंद्र मोदी इंदिरा गांधींप्रमाणे चूक मान्य करतील का? – निखिल वागळे

Update: 2020-11-20 11:19 GMT

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टवर अनेक मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आधी निखील वागळे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया...

"आज इंदिरा गांधींची जयंती. त्यांचं कर्तृत्व मला मान्य आहे, पण मी काही त्यांचा चाहता नाही. पुरुषप्रधान समाजात एका महिलेने पंतप्रधान होणं ही मोठी बाब होती. बांगला देश निर्मितीनंतर त्यांची लोकप्रियता पराकोटीला पोहोचली. विरोधी पक्ष विकलांग झाले. राजकारणातल्या लाचारीला प्रतिष्ठा त्यांच्या काळात मिळाली, वैयक्तिक महत्वाकांक्षा प्रभावी झाली, लोकशाही संस्था खिळखिळ्या झाल्या आणि देशावर हुकूमशाही लादली गेली. त्यांची हत्या ही त्यांनीच जन्माला घातलेल्या दहशतवादाने केली. आज मोदींपुढे आदर्श असेल तर त्यांचाच आहे. पण अखेर इंदिरा गांधीचा पराभव झाला, त्यांनी आपली चूक जाहीरपणे मान्य केली. नरेन्द्र मोदी हे कधी काळी करतील का हा प्रश्न आहे.

हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी इंदिरा गांधींची आठवण नेहमी कामी येवो ही इच्छा. अभिवादन." निखिल वागळे यांच्या पोस्टवर राजू कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती खालील प्रमाणे

"पहिले वाक्य तुमच्या व्यक्तिगत आदराचा विषय आहे. दुसरे वाक्य तुमच्या वैयक्तिक आकलनाचा विषय आहे. या दोन्ही वाक्यांबद्दल माझे कांहीही मत नाही. तो आपला लोकशाही व्यवस्थेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत विषय आहे. मात्र तिस-या नि चौथ्या वाक्याशी मी असहमत आहे व असहमत असण्याचा माझाही अधिकार आहे. नेहरूंनी संघाला कशी प्रतिष्ठा मिळवून दिली? परेडमधे सहभागी होऊ दिल्याची कथित माहीती खोटी आहे.

अनेक लोक इंदिरा यांच्याशी मोदींची तुलना करतात. पण सरकारी यंत्रणेचा प्रचारासाठी गैरवापर केला म्हणून पंतप्रधान मोदींची निवडणुक रद्द करून त्यांना सहा वर्षासाठी निवडणुक लढविण्यास बंदी करणारा निकाल आज एखादे न्यायालय देऊ शकेल काय? असा निकाल एखादा न्यायाधीश देण्याची हिंमत करू शकेल काय? एवढी स्वायत्त न्यायसंस्था सध्या आहे काय?

आणखी एक बाब, मोदींना सुरक्षेचा सल्ला म्हणून सुरक्षा व्यवस्थेतील शिख, मुस्लिम, ख्रिस्ती वा नॉन हिंदु सैनिक काढून टाका असा सल्ला दिल्यावर मोदी इंदिराजीं प्रमाणेच वागतील की अशा सुरक्षा सैनिकांना हटवतील? यावेळी त्यांची भूमिका काय असेल? इंदिराजी सर्वधर्मसमभाव मानणा-या होत्या की, मोदींसारख्या कट्टर धर्मवादी होत्या? इंदिराजी मोदी सारख्या अल्पसंख्याक विरोधी नि बहुसंख्याकवादी होत्या काय? मोदी आणि इंदिराजी यांच्यात साम्य पाहणा-यांना दोघांनी व्यक्तीगत जीवनात जबाबदारीचं वहन कसं केलं हे माहीत नसेल काय? इंदिरांबाबत स्थिती अशी की, युवावस्था आईचे आजारपणात गेली. वयाच्या 18 व्या वर्षी आई वारली आणि चाळीशीत वैधव्य आलं. वडिलांची सेवा सुश्रुषा करत करत गृहस्थीजीवनातील सर्व जवाबदा-या पार पाडत राजकीय नेतृत्व केलं. अशी स्थिती मोदींबाबत नाही तरीही लोक दोघात साम्य का शोधत असतील बरं?

आणीबाणीत मी खूप सुखी, सुरक्षित होतो कारण मी आईच्या पोटात होतो, सर्वात सुरक्षित जागी! आणीबाणी उठली नि माझा जन्म झाला. इंदिराजींचे स्मरण वा त्यांना अभिवादन करणे भारतीयांवर अनिवार्य नाही. तो ऐच्छिक विषय आहे."

Tags:    

Similar News