मृत पत्नीला खांद्यावर घेऊन पतीचा प्रवास, महाराष्ट्राच्या विकासाचं जळजळीत वास्तव

Update: 2021-09-08 14:44 GMT

बिहार, उडीसाला ही लाजवेल अशी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. पतीला आपल्या मृत पत्नीला खांद्यावर घेऊन प्रवास करावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिधली पाडवी असं मृत महिलेचं नाव असून या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.



आज 8 सप्टेंबर 2021 रोजी सिधली बाई पाडवी यांना त्यांचे पती त्या आजारी असल्याने चांदसैली हून तलोद्याला आणत होते. दुर्दैवाने चांदसैली घाटात दरड कोसळल्याने तिच्या पतीवर (आदल्या पाडवी) तिला पायी घेऊन जाण्याची वेळ आली. आणि रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी केलीपानी तालुका तळोदा ह्या गावातून एका गर्भवती महीलेला झोळीत घेवून खाली आणावे लागले होते.



चांदसैली येथील उपकेंद्र येथे डॉक्टर हजर राहत नाहीत व उपकेंद्र बंद असते. तसेच इथे कुठल्याही मोबाईल कंपनीचे टॉवर नसल्याने रेंज नाही व आरोग्य विभागाची गाडी १०८ ही मागवता येत नाही. तसेच मागील तीन वर्षांपासून चांदसैली घाटाच्या कठड्यांची व दरड कोसळण्याची लेखी तक्रार आम्ही लोक संघर्ष मोर्चा मार्फत शासनाला करीत आहोत. तरीही काहीही बदल होताना दिसत नाही.vअशी माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.



नंदुरबार जिल्हा हा आकांशा योजनेतील जिल्हा असून यासाठी विशेष निधी येतो. पंतप्रधान सडक योजनेची अनेक कामं अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत. आम्ही या बाबत वारंवार नवसंजवणी बैठकीत तक्रार मांडून ही काहीही फरक पडत नाही.



आदिवासी विकासासाठी स्वतंत्र निधी असूनही इथली दैना संपत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून लोक संघर्ष मोर्चा ह्या सर्व प्रकाराची निदा करत असून ह्या घटनेला जबाबदार आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच आदल्या पाडवी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असं देखील प्रतिभा शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसंच लोक संघर्ष मोर्चा ह्या बाबत कायदेशीर मार्गाचाही अवलंब करणार आहे. असं लोक संघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे.

Tags:    

Similar News