राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ED आणि IT कडे तक्रार, निधीची चौकशी करण्याची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (RSS)ED आणि आयकर विभागाकडे (INCOME TAX) तक्रार करण्यात आली आहे. नागपूरमधील(NAGPUR) सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे, कोरोनाच्या (COVID) काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खर्च केलेले शेकडो कोटी रुपये कुठून आली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी ईडीकडे केली आहे. RSSचे @RSSorg या नावाने ट्विटर अकाऊंट आहे. या अकाऊंटवर RSSने 1 कोटी पेक्षा जास्त लोकांना रेशनिंग किट, सात कोटी लोकांना तयार जेवणाची पाकीटे तर 27 लाख स्थलांतरीतांना मदत आणि 13 लाख परप्रांतीय लोकांना मदत केल्य़ाचे दावे केले आहेत. मोहनीश जबलपुरे यांच्या मतानुसार या सगळ्यावर झालेला खर्च हा साधारण 1 हजार कोटींच्या आसपास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संस्था नाही आणि त्यांचे बँकेत खातेही नाही मग त्यांच्याकडे एवढा निधी आला कुठून. एवढेच नाही तर लॉकडाऊन काळात कुणी घराबाहेर पडू शकत नव्हतं तेव्हा RSS ने एवढा निधी कुठून उभा केला, असा सवाल मोहनीश जबलपुरे यांनी आपल्या तक्रारीमध्ये विचारला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केल्याचा आणि निधी गोळा केल्याचा दावा RSS करत आहे, पण हे सगळं खरं आहे का याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जबलपुरे यांनी केली आहे. धर्मदाय आयुक्तांकडेही आपण तक्रार केली होती. पण धर्मदाय आयुक्तांनी ही तक्रार फेटाळत RSSवर कारवाई करणं हे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असे उत्तर दिल्याचे जबलपुरे यांनी म्हटले आहे.