निर्णय प्रक्रियेतील गोंधळाची परंपरा ठाकरे सरकारने सुरूच ठेवल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. तसेच शाळा सुरू करण्यासाठी जीआरला देखील काढला गेला होता. पण आता सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कोरोना संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध कमी केले आहेत. या अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी १७ ऑगस्टपासून कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन शाळा सुरू कराव्यात असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले होते. पण विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही, या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांच्या मनात धास्ती होती.
ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी आहे आणि निर्बंध शिथील केले आहेत, अशा ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच शहरांमधील आठवी ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.