विरोधकांकडून वारंवार राज्य सरकार अस्थिर असल्याची वक्तव्य केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. सरकारच्या स्थिरतेची काळजी करण्याची गरज नाही, जोपर्यत शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आहेत तोपर्यत सरकारला किंचितसुद्धा काहीही होत नाही...सरकार स्थिर आहे..असे अजित पवार यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला जोरदार उत्तर दिले आहे. पुण्यातील कोरोना परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेबाबत अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात येणाऱ्या काळात बेड वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.