पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली NIA ने अटक केली आहे. पण आता त्यांच्या अटकेविरोधात मुस्लिम संघटनांनी आवाज उठवला आहे. औरंगाबादमध्ये कोविडकाळात स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता सर्व जातीधर्माच्या लोकांना PFIच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. कोविड मृतांवर जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले. केवळ सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना अटक केली जात आहे. हे खोटे गुन्हे रद्द करुन त्यांची निर्दोष मुक्तता करावी, अशी दडपशाही सहन केली जाणार नाही, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू असा इशारा मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे.
"ज्या युवकांना अटक झाली त्यांना आम्ही ओळखतो. ते सर्व निर्दोष आहेत. या तरुणांचा दोष काय? असे विचारले असता केवळ वरून आदेश आहेत, असे सांगितले जाते" असा आरोप त्यांनी केला आहे. सिमी संघटनेबाबत प्रश्नाला उत्तर देताना सिद्दिकी म्हणाले, मागील २५ वर्षांपूर्वी सिमीवर बंदी घालण्यात आली. त्या प्रकरणात अटक केलेल्यांना न्यायालयात अजून दोषी ठरवलेले नाही. जोपर्यंत न्यायपालिका त्यांना दोषी मानत नाही तोपर्यंत ते आमच्यासाठी निर्दोष आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.