घरी जेवण, बाहेर येऊन गेम… मुन्ना पोळेकरने शरद मोहोळ वर झाडल्या गोळ्या
Munna Polekar Sharad Mohol | पुण्याला हादरवणारी मोठी घटना कोथरूड येथे दिवसाढवळ्या घडली. काल कुख्यात गुंड शरद मोहोळ याला एकदम फुलप्रुफ प्लॅन करून मारायचा प्लॅन रचला गेला. गोळीबार करणारा मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद मोहोळच्या घरी जेवला आणि बाहेर येताच त्याचा पद्धतशीर गेम केला.;
Pune : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ राहत असलेल्या घरा शेजारीच मोहोळवर गोळ्या झाडल्याच समजतंय. त्यानंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान मोहोळ याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ खुनाची बातमी राज्यभर पसरताच पोलिसांनी अवघ्या 8 तासात मुख्य आरोपी असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह ७ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मुन्ना पोळेकरने का वाजवला मोहोळ चा गेम?
मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याचाच साथीदारच होता. मुन्ना आणि शरद मोहोळ यांच्यात आधी जमिनीच्या पैशातून वाद झाला होता. या वादातूनच मोहोळ याने मुन्नाला मारहाण केल्याची माहिती समजली आहे. या वादानंतरच मुन्ना याने मोहोळला संपवायचं ठरवलं असावं. आरोपी मुन्ना साथीदारांसह शरद मोहोळच्या घरी आला. शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस असल्याने सर्वांनी घरीच जेवण केलं.
जेवण केल्यानंतर सगळे बाहेर आले, शरद मोहोळ पुढे चालला होता आणि मुन्ना पोळेकर त्याच्या साथीदारांसह मागे चालला होता. काही वेळात मुन्ना याने मोहोळवर चार गोळ्या झाडल्या. पहिली गोळी पायाला लागली तर दोन गोळ्या पाठीत मारल्या. मागून कोणी हल्ला केला हे पाहण्यासाठी मोहोळ मागे फिरला तेव्हा त्याच्या छातीत गोळी मारली. गोळ्यांचा आवाज झाल्याने आजूबाजूचे सगळे बाहेर आले. त्यावेळी सर्व आरोपी पसार झाले होते. त्यानंतर शरद मोहोळ याला जवळच्या सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
पुण्यात मात्र एकच चर्चा...
शरद मोहोळ याला भरदिवसा गोळ्या घालून संपवल्याने टोळी युद्ध परत सुरू तर झालं नाही ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण काही वेळाने मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ याला गोळ्या मारल्याचं समजलं. पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली होती.
दरम्यान, पोलिसांना पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते शिरवळ दरम्यान एक संशयित स्विफ्ट दिसली. या गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोन चार चाकी गाड्या 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंडही ताब्यात घेतले आहेत. मुन्ना पोळेकरसोबत नामदेन कानगुडे, नितीन कानगुडे आणि गांडले अशी तीन आरोपीचं नावं समजली आहेत