अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारलेल्या प्रश्नावरून पत्रकाराला महापालिकेची नोटीस
अहमदनगर : अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याना पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनाने थेट एका वृत्तपत्राच्या पत्रकाराला नोटीस बजावली आहे. महापालिकेने थेट पत्रकाराला नोटीस बजावल्याने पालिका प्रशासनावर जोरदार टीका होत असून याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी तीव्र नाराजी दर्शवत निषेध व्यक्त केला आहे.
जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एका दैनिकाचे पत्रकार मिलिंद देखणे यांनी महापालिकेकडून नागरिकांसाठी आलेली लस बाहेर विकली जात असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत प्रश्न विचारला. मात्र, देखणे यांचा हा प्रश्न महापालिका प्रशासनाच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी देखणे यांना नोटीस बजावली, प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, हा मुलभूत अधिकारच मान्य न करण्याची मनपाची भूमिका तालिबानी असून या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे.
प्रश्न विचारल्याने त्रागा करण्यापेक्षा मनपाने आपला कारभारात सुधारणा करायला हवी, जर कोठे लसीचा काळाबाजार झाला असेल तर त्याची चौकशी करावी. मात्र असे न करता पत्रकारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मनपाची भूमिका आक्षेपार्ह आणि माध्यमांचा आवाज बंद करणारी आहे.
मनपाच्या अशा नोटिशीला आणि अरेरावीला आम्ही भीक घालणार नाही. पालकमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून नोटिस मागे घेण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत अन्यथा राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.