Chiplun floods: ठाणे महापालिका चिपळूणच्या मदतीला
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेची तीन वैद्यकीय पथके चिपळूणकडे रवाना करण्यात आली.
ठाणे : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेची तीन वैद्यकीय पथके चिपळूणकडे रवाना करण्यात आली.
150 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके महाडकडे रवाना
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे 150 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके महाडला यापूर्वीच रवाना झाली आहेत. यासोबतच चिपळूणची पुरपरिस्थिती पाहता तिथेही मदतकार्यासाठी पथके पाठवण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची तीन वैद्यकीय पथके रवाना करण्यात आलीत.
कोविड तसेच साथीच्या आजारांवर करणार उपचार
ही पथके महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. यामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. या पथकांसोबत रॅपीड अँटीजेन टेस्टींग किटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात आला आहे.