रेल्वे अपघातांना ब्रेक कोरोनामुळे मृत्यूदर घटला

Update: 2021-01-20 03:58 GMT

मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफ लाइन. मुंबईची लोकल थांबली तर मुंबई थांबते असं म्हणतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकल ट्रेनचा मोठा वाटा आहे. मुंबईच्या लोकलमधून साधारणपणे दररोज 80 लाखांपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यातून प्रवास करत असतात. मात्र, कधी ही न थांबणारी मुंबई कोरोनामुळे थांबली. मुंबईची लोकल ही थांबली. मात्र, हळूहळू लोकल सुरू झाली.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांसाठी सुरुवातीला लोकल सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर ठरावीक कालावधीमध्ये महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. सध्या महिलांसाठी 11 ते 3 आणि 7 ते 11 या कालावधीत लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. अद्यापर्यंत सर्वांसाठी लोकल सेवा सुरु न केल्यानं अनेकांच्या प्रवासांची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांचे जीव वाचले आहेत. आता तुम्ही म्हणाल कसे?

कोरोना महामारी मुळे मार्च 2020 पासून लोकल ट्रेनमधून सामान्य प्रवाशांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधानंतर 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रेल्वे प्रवाश्यांच्या अपघातांच्या प्रमाणात घट झाल्याचं समोर आलं आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 65 टक्के अपघात कमी झाल्याचं रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीत समोर आलं आहे. रेल्वे ने प्रवास करताना अनेक लोकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे आता प्रवासी संख्या कमी झाल्यानं अपघाताचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे.

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे माहिती मागितली होती. जानेवारी 2020 पासून डिसेंबर 2020 पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना किती लोकांचा मृत्यू किंवा जखमी झाले आहे? याची माहिती मागितली होती. या संदर्भात मुंबई रेल्वे पोलीसांनी माहिती दिली आहे.

या माहितीनुसार मुंबई उपनगरी रेल्वे पटरीवर रेल्वेगाड्यातून पडून किंवा पटरी क्रॉस करताना किती लोकांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात माहिती मागितली होती. तेव्हा माहिती अधिकारा अंतर्गत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये रेल्वे पटरी ओलांडताना 1116 प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला आहे. या दुर्घटनेत होणाऱ्या मृत्यूंची संख्येमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी झालेल्या अपघातात 983 पुरुष व 133 महिला प्रवाशांचा समावेश आहे. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या देखील 800 च्या पुढे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 878 प्रवासी जखमी झाले असून 688 पुरुष व 190 महिलाप्रवाशांचा समावेश आहे.

या संदर्भात मध्य रेल्वे तसंच पश्चिम रेल्वे असा विचार केला तर मध्य रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेपेक्षा जास्त अपघात झाले असून मध्य रेल्वेवर अपघातात मृत्यू पावलेल्या रेल्वे प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. मध्य रेल्वेवर एकूण 523 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 747 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 369 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 355 प्रवासी जखमी झाले आहेत.

कोणत्या कारणाने किती मृत्यू आणि जखमी? रेल्वेतून पडून दरदोज अनेक लोकांचा मृत्यू होतो. चालत्या गाडीतून पडून,खांबाचा फटका लागून, विजेचा शॉक लाऊन अनेक प्रवाश्यांचा मृत्यू होतो. या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार पटरी क्रॉस करताना सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

पटरी क्रॉस करताना 730 प्रवाशांचा मृत्यू, 129 जखमी

चालत्या गाड्यातून पडून 177 प्रवाशांचा मृत्यू, 361 जखमी

खांबाचा फटका लागून 2 प्रवाशांचा मृत्यू, 12 जखमी

प्लाटफार्म मध्ये पडून 1 प्रवाशांचा मृत्यू, 7 जखमी

वीजेचा शॉक लागून 4 प्रवाशांचा मृत्यू, 7 जखमी

आत्महत्या करून 27 प्रवाशांचा मृत्यू

नैसर्गिक मृत्यू आजारपणाने 167 प्रवाशांचा मृत्यू, 114 जखमी

अन्य कारणाने 6 प्रवाशांचा मृत्यू, 155 जखमी

अज्ञात कारणाने 2 प्रवाशांचा मृत्यू, १ जखमी

मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रुळ ओलांडताना किंवा ट्रॅक ओलांडताना 2013 पासून 2019 पर्यंत एकूण 24,534 प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले होते. तर 26,675 प्रवासी जखमी झाले होते.

वर्षाप्रमाणे किती मृत्यू आणि लोक जखमी? गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास 2013 मध्ये सर्वाधिक प्रवाशांचा वेगवेगळ्या कारणांतून मृत्यू झाला.

2013 मध्ये एकूण 3506 प्रवाशांच्या मृत्यू, 3318 जखमी

2014 मध्ये एकूण 3423 प्रवाशांच्या मृत्यू, 3299 जखमी

2015 मध्ये एकूण 3304 प्रवाशांच्या मृत्यू, 3349 जखमी

2016 मध्ये एकूण 3202 प्रवाशांच्या मृत्यू, 3363 जखमी

2017 मध्ये एकूण 3014 प्रवाशांच्या मृत्यू, 3345 जखमी

2018 मध्ये एकूण 2981 प्रवाशांच्या मृत्यू, 3349 जखमी

2019 मध्ये एकूण 2664 प्रवाशांच्या मृत्यू, 3158 जखमी

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागवलेल्या माहितीतून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे रेल्वे प्रवाशांची गर्दी हे प्रवाशांच्या मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. तसंच पटरी क्रॉस करताना अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. मात्र, यावर सरकारने अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.

या संदर्भात बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रेल्वे प्रशासने यावर लक्ष दिलेले नाही. त्यामुळं आजही रेल्वे पटरी क्रॉस करताना अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. अजून किती प्रवाशांच्या जीव गेल्यावर सरकारला जागं येणार? असा सवाल शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्डाला केला आहे. कारण थोड्याच दिवसात पुन्हा एकदा लोकल सेवा सुरू होइल. मात्र, पुन्हा एकदा अपघातांची संख्या वाढू शकते. असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Tags:    

Similar News