मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, २४ तासात ६ हजार ३४७ नवे रुग्ण
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. मुंबईत कोरोनाचे तब्बल ६ हजार ३४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र शनिवारी आढळलेल्या रुग्णांपैकी तब्बल ५ हजार ७१२ रुग्णांना कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. या नवीन रुग्णांमुळे मुंबईतील एक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता २२ हजार ३३४ वर गेली आहे.
मुंबईत ३१ डिसेंबरला कोरोनाचे ५ हजार ६३१ रुग्ण आढळले होते. एका दिवसात रुग्णांची संख्या सहाशेने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
दरम्यान राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे लोकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर तर निर्बंध वाढवावे लागतील, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे. दररोज रुग्णांची संख्या किती वाढते आहे, ते पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे