कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी, कोणत्या जिल्ह्यात पुरस्थिती?
गेल्या काही दिवसापासून राज्यात मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. त्यातच राज्यातील कोकणासह पुणे, गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभुमीवर नाशिक शहरातील शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे.;
बंगालच्या उपसागरासह ओडीसाच्या काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर कोकण किणारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाला अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात अतिमुसळधार तर राज्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मान्सूनने जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर कोल्हापुर, रत्नागिरी, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जालना, सातारा आणि चंद्रपुर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर नाशिक शहरात अतिवृष्टीची शक्यता असल्याने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच ज्या भागात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पुरप्रवण भागातील नागरिकांना इतरत्र हलवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तसेच मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत हा जोर कायम राहणार आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबरोबरच घाट परिसरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच नागरिकांनी समुद्रकिणारी भागात जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाचे दरवाजे एक ते दीड फुटांनी उघडले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील मुळा नदीवरील घारगाव परिसरातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबरोबरच कोल्हापुर जिल्ह्यातील 44 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणीपातळी धोक्याच्या स्थितीकडे जात आहे.
तसेच पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुट 4 इंच इतकी झाली आहे. तर इशारा पातळी ही 39 फुट इतकी आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.