"जबाबदार मुंबईकरांना" पोलिस बनण्याची संधी
कोरोनाच्या संकटाने सर्वच यंत्रणांवरील ताण वाढला आहे. यात लॉकडाऊनमुळे पोलिसांवरचा ताण तर कमालीचा वाढलाय. मुंबई पोलिस अशा “जबाबदार” मुंबईकरांच्या शोधात आहेत जे या करोनाच्या काळात मुंबईकरांचा ताण कमी करु शकतील... काय आहे मुंबई पोलिसांची ही “जबाबदार मुंबईकर, जबाबदार मुंबई पोलिस” मोहिम पाहूयात याकरता ही स्पेशल स्टोरी...
सध्या मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच मुंबई पोलिसांना कर्तव्य बजावताना होत असलेली कोरोनाची लागण, २४-२४ तास ड्युटी, त्यात रोज नवनवीन कडक निर्बंध यामुळे मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण आलाय. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक नवीन युक्ती शोधून काढलीये. या करता मुंबई पोलिसांनी कायद्याचा आधार घेतला आहे...महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम २१ (९) मधील दिलेल्या विशेष अधिकारा अंतर्गत पोलीस घटक प्रमुखांना असलेल्या अधिकाराद्वारे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये, मुंबई शहरात सुरु असलेल्या
कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अंमलबजावणी करिता विशेष पोलिस अधिकारी म्हणुन सामान्य नागरीकांची पण "जबाबदार मुंबईकरांची " नेमणूक केली जातेये, अशी माहिती पोलीस उपायुक्त चैतन्य एस यांनी दिली आहे.
विशेष पोलिस अधिकारी पदाकरीता कोणतीही परीक्षा नाही, कोणतीही मैदानी चाचणी नाहीये... पण ही नियुक्ती करत असताना पोलिसही विशेष काळजी घेतात. पण त्याही पेक्षा जास्त काळजी नेमणूक झालेल्या व्यक्तीला घ्यावी लागणार आहे...
कशी होणार नेमणूक?
अशा विशेष पोलिस अधिका-यांची नेमणूक क्षेत्रिय पोलिस उपायुक्त करतात स्थानिक पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशा विशेष पोलिस अधिका-यांची निवड करतात ज्या नागरीकांनी पोलिस मित्र किंवा स्वयंसेवक म्हणून पोलिसांसोबत काम केलेले असते अशा नागरीकांना प्रथम प्राधान्याने दिले जात आहे.
सोसायटीचे चेअरमन, सेक्रटरी, सदस्य, सुरक्षा प्रमुख यांना देखील प्राधान्य दिले जात आहे.
निवड केल्या जाणा-या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नसावा
निवड होणारी व्यक्तीं राजकीय आणि धार्मिक पार्श्वभुमीची नसावी
आता हे झाले सामान्य मुंबईकरांच्या विशेष नेमणुक बाबतची माहिती... पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे जबाबदारी महत्वाची असली तरी या पदाकरिता निवड करताना पोलिस अधिकारी कमालीची काळजी घेतात आणि निवड झालेल्या व्यक्तीलाही कमालीची काळजी घ्यावी लागते..
निवड झालेल्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी?
नियुक्ती झालेली व्यक्ती कोणाशीही असभ्य भाषेत बोलू शकणार नाही
नियुक्ती झालेली व्यक्तीने कोणालाही शारिरीक आणि मानसिक त्रास देणे योग्य नाही
नियुक्ती झालेली व्यक्ती कोणावरही बळाचा वापर करु शकत नाही
नियुक्ती झालेल्या व्यक्तीला कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार नसतील
नियुक्त झालेल्या व्यक्तीचे पद कधीही रद्द करता येवू शकते
नियंमांचे उल्लंघन केल्यास विशेष पोलिस अधिका-यांवर कारवाई केली जाईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे विशेष पोलिस अधिकारी ही नियुक्त फक्त काही दिवसांसाठी असेल. खरं तर प्रत्येक मुंबईकरांने कायदा सुव्यवस्था राखून आपली जबाबदारी पार पाडली तर मुंबई पोलिसांसोबतच इतर यंत्रणांवर देखील ताण येणार नाही.