टीआरपी घोटाळ्या प्रकरणी अर्णब गोस्वामीच्या अडचणीत आता चांगल्याच वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रामध्ये अर्णब गोस्वामीचे नावही आले आहे. कारवां या वेबपोर्टलने ही बातमी दिली आहे. रिपलब्लिक टीव्हीचा कृत्रिम पद्धतीने टीआरपी वाढवण्यात अर्णब सहभागी असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी मंगळवारी हे आरोपपत्र दाखल केले आहेय. त्यामुळे आता अर्णबला अटक होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
टीआरपीचे आकडे आपल्या सोयीप्रमाणे बदलून घेण्याचा प्रकार काही वाहिन्यांनी केला होता. मुंबई पोलिसांनी हा प्रकार उघड केल्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत BARCचे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली होती. पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअप चॅटही पोलिसांच्या हाती लागले होते. यामध्ये अर्णब आणि पार्थो दासगुप्ता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले होते. पार्थो दासगुप्ताला अटक केल्यानंतरही पोलिसांनी अर्णबवर कारवाई केली नव्हती. पण आता याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात अर्णबचे नाव आल्याने अर्णबपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.