ऊर्जा क्षेत्रात हलगर्जीपणा सहन करणार नाही:ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील झालेल्या बत्तीगुल नंतर खडबडून जाग्या झालेल्या ऊर्जा विभागाच्या मंत्री डॉ. नितीन राऊत आता तिन्ही कंपन्यांना भेट देऊन तपासणी करत आहेत.
ऊर्जेच्या क्षेत्रात मुंबई महानगर विभागाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. १२ ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित झाला, त्या अनुषंगाने आज डॉ नितीन राऊत यांनी गोरेगाव येथील अदानी इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला भेट दिली, त्यावेळी डॉ राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या भेटी दरम्यान १२ ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित झाला त्यावेळी अदानीला नेमके कोणत्या अपयशाला सामोरे जावे लागले याची कारणमीमांसाही यावेळी डॉ राऊत यांनी जाणून घेतली. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल व अदानी व महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
"मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तिला सक्षम करण्यासाठी सर्व वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीची भेट घेऊन माहिती घेत असल्याचे डॉ राऊत म्हणाले." "मा. मुख्यमंत्री यांनी सोमवारीच अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार केलेले आहेत, त्यात डाटा सेंटर मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. भविष्यात मोठया प्रमाणात इलेक्ट्रीक वेहीकल स्टेशन (ईव्हीएस) येतील, अशावेळी विजेचा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे. डेटा सेंटर व ईव्हीएस सेंटर एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, अशी माहिती यावेळी डॉ राऊत यांनी दिली".
आज मुंबई व एमएमआर क्षेत्रात 4 कोटी 64 लाख लोकसंख्या असून 1 कोटी 2 लाख वीजजोडण्या आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला आवश्यक असणारी विजेची गरज पाहता वीज कंपन्यांना भेटी देऊन माहिती संकलित करीत आहे, असे डॉ राऊत यांनी यावेळी सांगितले.