कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचं काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे?," असा सवालही फडणवीस यांनी केला.
"मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. सरकार या कामात जेवढा उशीर करेल तितकी त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाणार आहे. उशीर झाला तर दिवसाला सर्व मिळून पाच कोटी रूपयांचं नुकसान होतं. गेलं वर्षभर हे काम रखडलं आहे. त्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झालंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं," असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. "आदित्य ठाकरे हे नवे आहेत. युवा आहेत. ते पहिल्यांदाच मंत्रिपदावर आहेत. त्यांनी जनतेसाठी काम करावं. त्यांनी अहवाल वाचून काम करावं. यापूर्वी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल त्यांनी वाचावा," असंही फडणवीस म्हणाले.
"पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या आदेशाची लिखित सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्वाची आहे. यामुळे सरकारचे पाच हजार ५०० कोटी रुपये वाचत आहेत. १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे," अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.
विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये : देवेंद्र फडणवीसमुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. फेब्रुवारीत याप्रकऱणी अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.