रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला आहे. तर सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याने मुंबई-गोवा महामार्गाला वेढा दिला आहे. त्यामुळे महाड येथील नातेखिंड व इतर ठिकाणी महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पुराचे पाणी आल्याने पाण्यात फसलेली वाहने व माणसे सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन व रेस्क्यू टीम काम करीत आहे.
गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे कोकणात विशेषत: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत नद्यांना पूर आला आहे. बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला आहे. तसेच रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.