Govinda Death : मुंबईत 22 वर्षीय गोविंदाचा पहिला बळी, आयोजकांवर गुन्हा दाखल
राज्य सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. त्यानंतर मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र यात जखमी झालेल्या गोविंदाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.;
मुंबईत विलेपार्ले याठिकाणी दहीहंडी खेळताना संदेश दळवी हा गोविंदा जखमी झाला होता. त्याची दोन दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. मात्र शनिवारीच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील विलेपार्लेमध्ये दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संदेश दळवी हा गोविंदा विलेपार्ले पुर्व येथील बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना 7 व्या थरावरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला मुंबईतील कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर जखम झाली. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
22 वर्षीय संदेश आपल्या आ, वडील, भावंडांसह कुर्ला येथे राहत होता. तर घरात सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. मात्र घरातील लाडका मुलगा गमावल्याने दळवी कुटूंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अनेक दहीहंडीमध्ये गोविंदा जखमी झाले. मात्र काही गोविंदांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र संदेश दळवी याला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर विलेपार्ले येथे दहीहंडी रियाज शेख यांनी आयोजित केली होती. तर गोविंदा पथकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयोजकांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी केली मदतीची घोषणा
गोविंदाच्या मृत्यूनंतर क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी गोविंदाच्या कुटूंबियांना दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.