आमदार राम कदमांचा प्रताप: पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी पोलिसांना फोन
पवईमध्ये एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी पोलिसांत फोन करत या आरोपींना शिक्षा करा. असं सांगण्याऐवजी त्या आरोपींना माणूसकी दाखवत सोडण्याची विनंती केल्याची एक ऑडिओ नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जे पोलिस रात्रंदिवस लोकांची सेवा करतात. त्या पोलिसांना मारताना आरोपींनी कोणती माणुसकी दाखवली. हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
दरम्यान आमदार राम कदम यांचा हा फोन सोशल मीडियात व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकाराचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
पवई पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण कल्याचे समोर आले आहे. ही मारहाण सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी या तिघांविरोधात तक्रार दाखल केली.
त्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या तिघांवर गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर कदम यांनी या संशयित आरोपींना पोलिसांनी सोडावे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये. यासाठी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन केल्याची एक Audio सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.
यावेळी राम कदम यांनी कॉन्स्टेबल खैरमोडे यांना फोन वर मारहाण करणाऱ्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, माणूसकी म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या भविष्याकडे पाहत त्यांना सोडावे असे म्हटले आहे. तसेच कदम यांनी असे पोलिसांवर हात सोडण्याची कृती आपल्याला मान्य नसल्याचे सांगताना, त्या मुलांच्या भविष्याचा एकदा विचार करा. असे पोलिस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी म्हटले आहे.
यावर पोलिस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी स्पष्ट नकार देत, आज जर यांना सोडले तर पोलिसांवर असेच हात उठत राहतील. मी माघार घेणार नाही. मला ड्युटीवर मारहाण झाली आहे. माझ्या चेहऱ्याला दुखापत झाली असून ओठही फुटल्याचे त्यांनी सांगितल्याचे संवादात स्पष्ट होत आहे. दरम्यान या ऑडिओ नोट ची मॅक्समहाराष्ट्र पुष्टी करत नाही.