रिलायन्स ग्रुपला नवे नेतृत्व मिळणार? मुकेश अंबानी यांचे संकेत

Update: 2021-12-29 06:34 GMT

देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि जगभरातील श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) यांनी आता रिलायन्स (Reliance) ग्रुपचे नेतृत्व बदलणार असल्याचे संकेत दिले आहेत. धीरुभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त रिलायन्सतर्फे फॅमिली डे (Reliance Family Day) साजरा केला जातो. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी आपल्या समुहातील अधिकारी आणि शेअर होल्डर्सशी संवाद साधला. यावेळ त्यांनी रिलायन्स समुह आता नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेमधून जात असल्याचे स्पष्ट केले. कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात चांगला बदल घडवताना देशाच्या विकासाला हातभार लावण्याची आपले वडील धीरुभाई अंबानी यांच्यातील जिद्द आणि कर्तृत्व नवीन पिढीमध्ये आपल्या दिसत असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. रिलायन्स ग्रुपला आणखी यशस्वी करण्याकरीता त्यांना शुभेच्छा देऊया असे आवाहन मुकेश अंबानी यांनी केले.

मोठे स्वप्न आणि कठीण वाटणारे लक्ष्य साध्य करण्यासाठी योग्य नेतृत्व असणे गरजेचे असते, असे सांगत मुकेश अंबानी यांनी मोठ्या बदलाचे संकेत दिले. Reliance सध्या अशाच नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेमधून जात आहे. ही बदलाची प्रक्रिया आमच्या पिढीतील ज्येष्ठांकडून पुढच्या पिढीतील तरुण नेतृत्वाकडे जबाबदारी दिल्यानंतर पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. मुकेश अंबानी यांना ३ मुलं आहेत, आकाश, अनंत आणि इशा अंबानी अशी तिघांची नावे आहेत. त्यांची तिन्ही मुलं सध्या ग्रुपमधील काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. आकाश, अनंत आणि इशा रिलायन्स ग्रुपला नव्या उंचीवर घेऊन जातील याबद्दल आपल्याला विश्वास आहे, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. या नवीन नेतृत्वाला मार्गदर्शन करुन सक्षम करणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्यापेक्षाही ते चांगले काम करतील यासाठी त्यांना मदत केली पाहिजे, असे आवाहन मुकेश अंबानी यांनी केले आहे.

द क्वींटने दिलेल्या वृत्तानुसार लिस्टेड कंपन्यांमध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर एकच व्यक्ती न ठेवता ते विभागण्यात यावे यासाठी सेबीने दिलेली मुदत एप्रिल २०२२मध्ये संपते आहे, या पार्श्वभूमीवर अंबानी यांनी ही घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर २००२मध्ये रिलायन्स समुहाची सूत्र आपल्या हातात घेतली होती.

मुकेश अंबानी यांची मुलं सध्या काय करतात?

मुकेश अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश, इशा आणि अनंत...सध्या ही तिन्ही मुलं रिलायन्स टेलिकॉम, रिटेल आणि रिलायन्स एनर्जी या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत.

Tags:    

Similar News