MPSC विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, चित्रा वाघ संतापल्या

याचिका दाखल करणाऱ्या 86 विद्यार्थ्यांनाच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिल्याने एमपीएससी विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यावरून पुण्यात विद्यार्थ्यांनी आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावरून चित्रा वाघ यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.;

Update: 2022-01-27 01:55 GMT

राज्य लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये आता नवा वाद निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला अर्ज भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आयोगाविरोधात आक्रमक झाले आहेत. तर रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत होते. दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यावरून चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसात पेपर फुटीचे अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे विद्यार्थी निराशेत असतानाच एमपीएससीने जारी केलेल्या चुकीच्या उत्तरांमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यापैकी 86 विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने कौल दिल्याने MPSC ने 86 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यावरून विद्यार्थी विरूध्द राज्य लोकसेवा आयोग नवा वाद रंगला आहे.

एमपीएससीच्या चुकीच्या उत्तरतालिकेचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला असताना एमपीएससीने 86 विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसण्याची परवानगी का दिली? असा सवाल करत विद्यार्थी रस्त्यावर आले. यावेळी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला.

यावरून चित्रा वाघ म्हणाल्या की, मुख्यमंत्री साहेब, प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना तुमच्या पोलिसांनी आंदोलनाला बसलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. हे मराठी विद्यार्थी आहेत, दहशतवादी नाहीत, असे म्हणत संताप व्यक्त केला. तर पुढे मुळात आयोगाच्या घोडचुकीने मुलांवर अन्याय झाला आहे. तर आता विद्यार्थ्यांवरच लाठीचार्जचे आदेश? असे म्हणत राज्याला मुख्यमंत्री नाही तुघलक मिळाला आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की आयोगाने घेतलेल्या संयुक्त मुख्य परीक्षेत गोंधळ झाला. त्यात उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र ८६ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केल्याने ८६ विद्यार्थ्यांनाच मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी आयोगाने दिली. मात्र अजूनही अनेक विद्यार्थी न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विद्यार्थ्यांचे वाटोळे करू नका, अशी विनंती  चित्रा वाघ यांनी केली.

Tags:    

Similar News