पदवी पात्र पदव्यूत्तर अपात्र, MPSC च्या निर्णयामुळे पत्रकारितेच्या पदवीवरच प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या पदभरतीसंदर्भात अजब निर्णय घेतला आहे. यामध्ये पदवीचे विद्यार्थी पात्र मात्र पदव्यूत्तर डिग्री अपात्र ठरवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) काही दिवसांपूर्वी माहिती व जनसंपर्क विभागाची (Job alert) भरती जाहीर केली. मात्र या भरतीसंदर्भात नवी नियमावली पुढे आली आहे. त्यामध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केलेले विद्यार्थी पात्र, पदवी घेणारे विद्यार्थी पात्र मात्र पदव्यूत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या पदवीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क (Information and Broadcasting department) महासंचालनालयामध्ये विविध पदांसाठी ४२ जागांची भरतीची जाहिरात MPSCद्वारे काढण्यात आली होती. गट-अ वरीष्ठ, गट-अ कनिष्ठ आणि गट-ब अशा श्रेणीचे हे ४२ पद असून यासाठी सोमवार २३ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे उपरोक्त सर्व ४२ पदांसाठी सारखीच शैक्षणिक आणि अनुभवाची पात्रता ठेवण्यात आली होती. शैक्षणिक पात्रतेमध्ये पत्रकारितेच्या पदवी आणि पदविकेची अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय ठरणार आहे. त्यामुळे MPSC चा निर्णय हा पत्रकारितेच्या पदवीवर प्रश्न उभा करणार आहे.
अनेक विद्यापीठांमध्ये पत्रकारितेचे पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी असे कोर्सेस चालविले जातात. विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीमध्ये वरील सर्व कोर्सेस एकमेकांना पर्याय म्हणून दर्शविण्यात येतात. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार पदवी आणि पदविका हिच शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे. यापेक्षा मोठी शैक्षणिक पात्रता आयोगाला मान्य नसल्याचे या निर्णयाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
MPSC च्या जाचक नियमावलीमुळे पत्रकारितेचे शिक्षण घेऊन अनेक प्रसार माध्यम संस्थांमध्ये कार्य करून पात्रता मिळविलेले पत्रकार अपात्र ठरले आहेत. तक्रार आणि शंकांच्या निरसनासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर काही क्रमांक देण्यात आलेले आहेत. या क्रमांकांवर फोन करून माहिती दिली असता त्यावरून सचिवांच्या ई-मेलवर तक्रार नोंदविण्यास सांगितले जाते. मात्र त्या तक्रारीवर कुठलेही उत्तर मिळत नसल्याची भावना पदव्यूत्तर पत्रकारितेची पदवी घेतलेल्यांनी व्यक्त केली.
एकीकडे वर्ग १ आणि २ च्या पदांसाठी जाहिरात काढली जाते. त्यासाठी पदवी आणि पदविका अर्थात डिप्लोमा ग्राह्य धरला जातो. पण पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना अपात्र ठरवले जाते. हा नवा शोध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑनलाईन अर्ज सादरीकरणात येणा-या अडचणी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मंगळवारी २४ जानेवारी रोजी आश्वासन दिले.
अन्यथा आमच्या पदव्या परत घ्या, MPSC च्या विद्यार्थ्यांची संतप्त प्रतिक्रीया दोन वर्ष पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अभ्यास करायचा. त्यानंतर पुढे जाऊन कळते की, या पदवीला अर्थच नाही. मग अशा पदव्युत्तर पदव्या देणा-या विद्यापीठांच्या पदव्याच परत घ्या, अशी मागणी संतप्त विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे मागील दशकभरानंतर माहिती व जनसंपर्क विभागात मोठी पदभरती काढण्यात आली आहे. मात्र आयोगाच्या तर्कहिन तांत्रिक त्रुटीमुळे आज हजारो विद्यार्थी या पदभरतीपासून वंचित राहत आहेत. आयोगाने यासंदर्भात कार्यवाही करून पदभरतीतील त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज स्वीकृती करावी. अन्यथा विद्यापीठांचे कुलपती राज्यपालांकडे अशा अपात्र ठरविणा-या पदव्युत्तर पदव्या परत करू, अशी माहिती पदभरतीपासून वंचित विद्यार्थ्यांनी दिली.