अहमदनगर जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभुमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 11 तालुक्यातील तब्बल 61 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींवर निर्बंध लादले आहे, 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत हे निर्बंध असणार आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला संबधित गावातील व्यापाऱ्यांसह थेट जिल्ह्याचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोध दर्शवला आहे, विशेष म्हणजे खासदार विखे यांनी केवळ विरोधच दर्शवला नाही तर जिल्ह्यातील ज्या- ज्या तालुक्यात भाजपचे आमदार आहेत केवळ त्या गावातच असे निर्बंध लादल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान खासदार विखे यांनी संबंधित गावातील व्यापारी तसेच नागरिकांसह जिल्हाधिकारी भोसले यांनी भेट घेत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी भेट घेतल्यानंतर खासदार विखे यांनी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे म्हटले आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे आमदार आणि मंत्री असलेल्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असताना केवळ भाजपचे आमदार असलेल्या तालुक्यातच हे निर्बंध लावले असल्याचा आरोप त्यांनी केला. सोबतच ज्या गावात 10 कोरोना रुग्ण त्या गावात निर्बंध हा निकष चुकीचा असून , गावातील लोकसंख्येवर हा निकष लावला पाहिजे असं खा. विखे यांनी म्हटले आहे.
दरम्यान खासदार विखे यांनी केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव असल्याच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना विचारले असता त्यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे म्हटले असून हा निर्णय शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धार्मिक स्थळं खुले करण्याबाबत कोणताही निर्णय नाही
दरम्यान नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी राज्यातील मंदिरं व धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी जिल्ह्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच काही देवस्थानांनी मंदिरं खुली करण्याबाबत निर्णय घेतला आहे, मात्र ते कोरोना नियमांचे कसे पालन करणार आहेत याबाबत त्यांच्याकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली असून ती माहिती आल्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ठरवले जाईल असं जिल्हाधिकारी भोसले यांनी म्हटले आहे.