ED आणि भाजपा एकच, सुप्रिया सुळे यांची टीका
राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि भाजप एकच असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरींगप्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. तर ईडी आणी भाजप एकच आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
बुधवारी सकाळी ईडीने मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरू केली. तर एक तास चौकशीनंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांच्या अटेकवर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, आपण कुणासमोर झुकणार नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले असले तरी त्यांना झालेली अटक आश्चर्यकारक आहे. तसेच इतका अतिरेक होईल असे वाटले नव्हते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भुमिका कुणी घेतली नव्हती. कारण गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते सातत्याने ट्वीट करून 15 दिवसांनी अटक होईल, असे भाकित वर्तवत होते. मात्र ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडी आणि भाजपमध्ये फरक तो काय ? त्यामुळे ईडी आणि भाजप एकच असल्याचा अर्थ काढावा लागेल, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
आम्ही पूर्ण ताकदीने लढू. सत्य नक्कीच जिंकेल. लोकांना त्रास द्यायचा, भीती दाखवायची असा प्रयोग आहे. पण आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. त्यामुळे नवाब मलिक यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहु, अशी भुमिका सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.