नवी दिल्ली // "औरंगजेब आता है, तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं" असे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. याच मुद्द्यावरून खासदार सुळे यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी, सीबीआयच्या नोटीसा पाठविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सोईस्कर वापर करू नये, असे सुळे यांनी सुनावले. विरोधक असला आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याच्या कुटुंबाला, महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही लक्ष्य केले नव्हते, असा घणाघात खासदार सुळे यांनी संसदेत केला.
पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख काशी विश्वनाथ धाम काॅरिडाॅरच्या उद्घाटनावेळी केला होता. त्याचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपवर टिकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध उभे राहिले, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. महाराष्ट्रामध्ये अनेक जणांची ईडी, प्राप्तिकराची प्रकरणे असतील. त्यातील चूक किंवा बरोबर याबाबत बोलायचे नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबियांना ज्या प्रमाणे लक्ष्य केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे.असं खासदार सुळे म्हणाल्या.
छत्रपतींबद्दल सत्ताधाऱ्यांचे बोलणे भावनिक परंतु वर्तन वेगळे आहे. छत्रपतींनी नेहमी महिला, मुलांचे संरक्षण केले. ईडी, सीबीआयच्या छाप्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगताना खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी श्रीमती खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुटुंबिय यांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला.
राज्य सरकारांना जीएसटीच्या भरपाईसाठी होणारा विलंबाचा मुद्दाही उपस्थित केला.