महामार्गाचे निकृष्ट काम, कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करण्याचा सुनिल तटकरेंचा इशारा

Update: 2021-06-14 14:54 GMT

रायगड - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी खासदार सुनिल तटकरे यांनी केली. गेल्यावर्षी तटकरे यांनी पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र सोमवारच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अमंलबजावणी केली नसल्याचे निदर्शनास आल्याने तटकरे चांगलेच संतापले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघडणी केली. या महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी व उणिवा आहेत.



त्यामुळे हा महामार्ग धोकादायक स्थितीत असून निष्पाप जीवांचे बळी जात असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कामाचा दर्जा सुधारा, अन्यथा ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू असा सज्जड दम देखील तटकरे यांनी यावेळी दिला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते व परिवहन खाते आल्यानंतर त्यांनी कोकणच्या रस्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित प्रशासन महामार्गाच्या कामाबाबत उदासीन असल्याची खंत खासदार तटकरे यांनी व्यक्त केली.

कोलाड आंबेवाडी नाका येथे कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पाण्याचा योग्य निचरा होण्याकरिता जलद उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याबरोबरच कुंडलिका नदी पूल व मईस दरा नदीवरील पुलांच्या कामाची पाहणी केली. पुलाचे काम दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करून वाहतुकीस खुले करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



 

पुई ग्रामपंचायत हद्दीत मोरी नादुरुस्त होऊन धोकादायक स्थिती आहे. या ठिकाणी दोन अपघात झालेले आहेत. याठिकाणी प्रत्यक्ष अपघात स्थळावरून तटकरे यांनी संबंधित ठेकेदार राजू पिचिका यांना फोन करून हे काम पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले, जलदतेने उपाययोजना केली नाही व या ठिकाणी अपघात घडल्यास संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले. महामार्गावर अनेक ठिकाणी योग्यपद्धतीने काम झाले नसल्याने खा.तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित ठेकेदारांना तातडीने पत्रव्यवहार करून भविष्यातील जीवघेण्या अपघाताला जबाबदार धरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना देण्याचे आदेश दिलेत.

Tags:    

Similar News