'देवेंद्रजी, उद्या मुख्यमंत्री व्हाल, पंतप्रधान व्हाल , पण ...' ; संभाजीराजेंच्या विधानाने जोरदार चर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. मात्र, महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व अन्य आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, त्यामुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चाळीसगाव येथे बोलताना म्हटले आहे.;
चाळीसगाव // चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण बुधवारी पार पडले. यावेळी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती.
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली. मात्र, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. मात्र, महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व अन्य आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, त्यामुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एकच अपेक्षा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे, असं संभाजीराजेंनी यावेळी बोलताना म्हटले.
सोबतच राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, परंतु, आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. असे आवाहन संभाजीराजेंनी केले.