मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये नक्की काय घडतंय?

मध्यप्रदेशचं खरगोन शहर देशभरात का चर्चेत आहे...? काय घडतंय खरगोन मध्ये? वाचा

Update: 2022-05-01 13:33 GMT

मध्यप्रदेशमध्ये खरगोनमध्ये शांतता असल्याचा दावा मध्य प्रदेश सरकार करत आहे. मात्र, आज रविवारी सरकारने अचानक खरगोनमध्ये सोमवारी आणि मंगळवारी कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या मुस्लीम बांधवाचा रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. खरगोनमध्ये लावण्यात आलेल्या या कर्फ्यूमुळे आता मुस्लीम बांधवाना त्यांच्या घरात नमाज अदा करावा लागत आहेत. सरकारने लावलेल्या कर्फ्यूमुळे त्यांना मशीद किंवा ईदगाह मध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. मध्यप्रदेशातील ही पहिलीच वेळ आहे की राज्य सरकारने अशा प्रकारे शहरात सणादरम्यान कर्फ्यू लावला आहे.

गेल्या महिन्यात रामनवमीच्या वेळी खरगोनमध्ये सांप्रदायीक हिंसाचार झाला होता. सोमवारी किंवा मंगळवारी ईद साजरी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी संचारबंदी असेल.

खरगोनचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी समर सिंह यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. "2 मे आणि 3 मे रोजी खरगोनमध्ये संपूर्ण कर्फ्यू लागू केला जाईल. लोकांनी घरीच ईदची नमाज पठण करावी. मात्र, दोन्ही दिवशी दुकाने सुरू राहतील आणि ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांना पास दिले जातील, असे त्यांनी सांगितले आहे. अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती या दिवशी कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, या दोन्ही सणांवर कोणतेही मोठे कार्यक्रम होत नाहीत.

काय आहे प्रकरण?

10 एप्रिल रोजी खरगोनमध्ये मिरवणुकीदरम्यान हिंदू-मुस्लिम गटांमध्ये वाद झाला होता, त्यात 24 जण जखमी झाले होते. यात एकाचा मृत्यू झाला असून पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचं बोललं जात आहे. खरगोनमधील आनंद नगर येथील कॉटन मार्केट परिसरातील रहिवासी असणाऱ्या इब्रिस खान या तरुणाचा मृतदेह इंदोरमध्ये सापडला होता. त्याला शेवटी पोलिसांसोबत पाहण्यात आले होते.

पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी इब्रिस खानच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. एसपींवर गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. खरगोनमध्ये जातीय हिंसाचाराचे 64 गुन्हे दाखल झाले असून, त्यात आतापर्यंत 150 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये विशिष्ट समाजातील लोकांची संख्या जास्त आहे. पोलिसांनीही अशा अनेकांना दंगलखोर म्हणून घोषित केले आहे, जे इतर कोणत्या ना कोणत्या प्रकरणात तुरुंगात आहेत.

मध्य प्रदेश सरकारने आगामी सणांच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. त्या दृष्टीकोनातून ईद सह आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि हनुमान जयंती या सणाला विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

Tags:    

Similar News