खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाकडून रद्द, खासदारकी धोक्यात?
नेहमीच वादात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द ठरवले आहे;
जात प्रमाणपत्र आणि याआधीही खासदार नवनीत राणा वादात सापडला होत्या.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त खंडपिठाने निकाल देत खासदार नवनीत राणा यांना २ लाखांचा दंडही या संपुर्ण प्रकरणात ठोठावला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान जात प्रमाणपत्राला आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. या जात प्रमाणपत्राच्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्राला न्यायालयाने अवैध ठरवले आहे. तसेच खासदार नवनीत राणा यांना दंडही ठोठावला आहे. त्यामुळेच आगामी काळात नवनीत राणा यांची खासदारकी जाणार का? नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात अपील करणार याची उत्सुकता लागली आहे.
नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांचे परंपरागत विरोधी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्य पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणूकीदरम्यान सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. स्थानिक मतदार संघात खासदार राणा आणि माजी खासदार अडसूळ यांचा वाद सर्वपरिचित आहे.
यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देताना खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही तयारी आनंदराव अडसूळ यांनी दाखवली आहे. नवनीत राणा यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी येत्या दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांना तुरूंगात पाठवणार असल्याचेही आनंदराव अडसूळ यांनी यापूर्वीच सांगितले होते.
शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतसंघातून निवडणूकीत निवडून आल्या होत्या. त्याठिकाणी दुसऱ्या क्रमांकवरच आनंदराव अडसूळ यांना समाधान मानावे लागले होते. परंतु न्यायालयाच्या जात प्रमाणपत्राच्या निकालामुळे याठिकाणी नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत आली आहे.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पंजाबी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून याआधी काम केले आहे. त्यांनी २०११ मध्ये अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतरच अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. मुंबईतल्या आजोबांचेही प्रमाणपत्र हे बनावटरीत्या तयार करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. नवनीत राणा यांच्या आजोबांचे प्रमाणपत्रही मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेले काही दिवस सातत्याने खासदार नवनीत राणा या कोरोना काळातील लॉकडाऊन आणि त्याचे नियम उल्लंघन करण्याच्या प्रकरणात वादात सापडल्या होत्या. आता खासदार राणा यांची खासदारकी जाणार की पुन्हा निवडणुका लागणार की दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला संधी मिळणार हे सर्वस्वी न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.