राणा दांपत्याची रवानगी तुरुंगात, तात्काळ जामीनासही कोर्टाचा नकार
राणा दांपत्याला अटक केल्यानंतर वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणा दांपत्याची रवानगी कोठडीत झाली आहे.;
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याविषयीच्या वल्गना राणा दांपत्याला महागात पडल्या आहेत. तर शनिवारी राणा दांपत्याला खार पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज वांद्रे न्यायालयाने राणा दांपत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणा दांपत्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.
राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिक विरुध्द राणा दांपत्य वातावरण तापले होते. त्यातच मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता. तर दुसरीकडे राणा यांच्या खार येथील घराबाहेर शिवसैनिकांनी निदर्शने केले. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे राणा दांपत्याने मोदी यांचा मुंबई दौरा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मातोश्रीवर न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली. तर आज खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र राणा दांपत्याच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
न्यायालयात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माहिती देतांना राणा दांपत्यावर 124 (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर यासाठी धार्मिक कारणावरून तेढ निर्माण करणे, दोन गटात शत्रुत्व वाढवणे आणि देशाच्या एकोप्याला बाधा आणणे या आरोपांखाली पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली होती. तर आज महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी राणा दांपत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राणा दांपत्यावर 124 (अ) अंतर्गत कारवाई केल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर आक्षेप घेतला. त्यामुळे 27 तारखेपर्यंत आम्हाला आमची लेखी बाजू मांडण्यास कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
प्रदीप घरत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्यासाठी परवानगीची गरज असते. त्याबाबत राणा दांपत्याने नोटीस दिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांना आव्हान दिले. तसेच शासनाच्या नोटीशीला न जुमानता आव्हान दिले. त्यामुळे या सगळ्यात त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून येत आहे, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.
खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर भारतीय दंड विधान 353 अंतर्गत एक आणि 124 (अ) अंतर्गत रात्री उशीरा दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली. त्यामुळे यावर 29 एप्रिल रोजी सुनावणी करण्यात येणार आहे, असे राणा दांपत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी सांगितले.
कलम १२४ (अ) काय आहे?
देशात एखाद्या व्यक्तीने राष्ट्रीय चिन्हांचा अवमान केला, राज्यघटनेची बदनामी केली किंवा देशविरोधी कृत्ये केले तर त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम १२४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामध्ये त्या व्यक्तीने सरकारविरोधी किंवा देशविरोधी साहित्य निर्माण केले, देशविरोधी साहित्याला पाठींबा दिला किंवा देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला तडा जाईल असे वर्तन केले तर त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र शांततेला तडा जाईल असे वर्तन करणे, धार्मिक उन्माद पसरवणे किंवा समाजात द्वेष निर्माण करणे यासाठी स्वतंत्र कायदे असल्याने १२४ (अ) म्हणजेच देशद्रोहाच्या कलमावर आक्षेप घेतला जातो. तर अशाच प्रकारे १९९५ मध्ये बलवंतसिंग विरुध्द पंजाब राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने खलिस्तानच्या बाजूने केलेल्या घोषणेला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत घेण्यास नकार दिला होता. तर या कायद्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते, असा आरोप केला जातो.