अर्धा जून सरला, मान्सून गायब...शेतकरी हवालदील

Update: 2022-06-16 06:34 GMT

यंदा वेळेवर मान्सूनचे आगमन होणार आणि जोरदार पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. बीड जिल्ह्यातही जून महिना अर्धा सरला तरी पावसाने अनेक ठिकाणी ओढ दिली आहे. शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी पाऊस गरजेचा होता. मात्र जिल्ह्यातील खरिपाच्या सर्वच पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. 7 जुनला जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र काही ठिकाणी तुरळक पडला आहे.

यावर्षी सरासरीच्या तुलनेत केवळ 45 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पेरणीसाठी किमान 75 ते 100 मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे, त्याशिवाय पेरणी करु नका असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे. तर दुसरीकेड जिल्ह्यात 144 प्रकल्प आहेत, यापैकी 34 प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत आता 141 प्रकल्पांमध्ये केवळ 24 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यावर्षी पेरणी लांबणीवर पडल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, कापूस, सोयाबीन या पिकांची पेरणी उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत किती पाऊस?

बीड - 30.2

पाटोदा -54.1

आष्टी- 37.7

गेवराई- 56.9

माजलगाव- 45. 6

आंबेजोगाई -27.8

परळी -106.1

धारूर -44.1

वडवणी -67.5

शिरूर -30.1

एकूण 45 मिलि मीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पेरणी योग्य क्षेत्र

आष्टी – 55000 हेक्टर

पाटोदा- 33000 हेक्टर

शिरूर – 3190 हेक्टर

गेवराई -11500 हेक्टर

माजलगाव – 25300 हेक्टर

परळी – 36080 हेक्टर

आंबेजोगाई – 65120 हेक्टर

जत -76120 हेक्टर

वडवणी -3300 हेक्टर

धारूर -11880 हेक्टर

बीड- 44000 हेक्टर

"आम्ही खत, बी-बियाणे घेतले आहे. शेताची नांगरट पाळी केली आहे, मुग, उडीद, कापूस याची पेरणी उशिरा झाली तर त्याच्या उत्पन्नात घट होते. त्यामुळे आम्ही पावसाची वाट पाहत आहोत.", असे सुधाकर ठोंबरे या शेतकऱ्याने सांगितले.

"नक्षत्र पूर्ण चालले आहे. त्यामुळे मूग-उडदाची पेरणी लांबणीवर पडल्यामुळे आम्ही अडचणीत येत आहोत. पाऊस पडायला तयार नाही, बळीराजा फार अडचणीत आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आम्ही शेतकरी पाळ्या घालू घालू परेशान आहोत. शेताची सर्व मशागत केली आहे, पण पाणी नाही," असे हरिभाऊ कोकाटे यांनी सांगितले.

"कापसाची लागवड करायची आहे, त्यामुळे मी शेतीची सर्व मशागत केली आहे. शेतीला रासायनिक खत परवडत नाही म्हणून मी माझ्याकडे असलेल्या जनावरांचे शेण खत शेतात टाकले आहे. गेल्या वर्षी या शेतामध्ये ऊस लावला होता, तो मला परवडला नाही कारण ऊस तोडणीवाले एकरी पंधरा हजार रुपये मागत होते, वाहतूकीसाठी पैसे मागत होते. त्यामुळे मी यावर्षी ऊस मोडला आहे व कापसाची लागवड करणार आहे. शेतात मेहनत केली आहे आता पावसाची वाट पाहत आहे," असे रंजित भगवान काकडे यांनी सांगितले.


Tags:    

Similar News